सोलापूर : गत वर्षीच्या तुलनेत सोलापुरात मृत्यूचे प्रमाण कमीच असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सोलापुरात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सोबतच सोलापुरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मात्र, असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत सोलापुरात या कालावधीत झालेले मृत्यूच्या प्रमाणात कमी असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मागील वर्षी जानेवारी पासून मे पर्यंत तसेच यावर्षीच्या जानेवारी पासून मे पर्यंतची आकडेवारी या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. जानेवारी 2019 मध्ये 970, फेब्रुवारी 2019 मध्ये 915, मार्च 2019 मध्ये 829, एप्रिल 2019 मध्ये 781 तर मे 2019 मध्ये 764 लोकांचे मृत्यू झाले आहे. 2019 मध्ये जानेवारी ते मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता तेव्हाची ही आकडेवारी आहे. मात्र, 2020 मध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव आहे. मात्र, तरी देखील लोकांच्या मृत्यूची संख्या ही कमी आहे. जानेवारी 2020 मध्ये 875, फेब्रुवारी 2020 मध्ये 907, मार्च 2020 मध्ये 536 जणांचे मृत्यू झाले आहेत. सोलापुरात कोरोनाचा शिरकाव 12 एप्रिल रोजी झाला. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात 377 आणि 1 ते 26 मे पर्यंत 304 लोकांचे मृत्यू झाले आहेत. सोलापूर महानगर पालिका क्षेत्रात झालेल्या मृतांची ही आकडेवारी मयत आवक रजिस्टरनुसार देण्यात आली आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरुच
दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत सोलापुरात यंदाच्या वर्षी मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सोलापुरात जास्त आहे. राज्यात कोरोनाचे मृत्यूदर जास्त जिल्ह्यापैंकी सोलापूर देखील आहे. 10 जून पर्यंत सोलापूर शहरात कोरोनामुळे 122 तर ग्रामीण भागात 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी सर्वाधिक रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र, कारणांचा अधिक तपास करण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. आर. टी. बोरसे यांना येण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात डॉ. आर. टी. बोरसे हे सोलापुरात येऊन पाहणी करतील. डॉ. आर. टी. बोरसे हे मुळचे नेर, ता. धुळे येथील असून सध्या पुण्यातल्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालयाचे प्राध्यापक, पथप्रमुख आणि नायडू रुग्णालयाती कोरोना पॉझिटिव्ह कक्षाचे प्रमुख म्हणून कार्य़रत आहेत. पुण्यातील कोरोना विरोधातील लढ्यात डॉ. बोरसे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी सोलापुरात येऊन पाहणी करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
Corona Updates | महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांची नोंद
तसेच मृत्यूचे प्रमाण कशापद्धतीने कमी करता येईल यासाठी त्यांचा सल्ला घेणार असल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेतेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळ्या औषधांचा वापर करुन देखील पाहिले जाणार आहे. टोसिलीजुआंब (Tocilizuamab) या औषधाची वापर करुन तपासणी केली जाणार आहे. सोलापुरच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक स्वरुपात या औषधाच्या 10 इंजेक्शन मागविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 इंजेक्शन हे प्राप्त झाले असून 5 उद्या (शुक्रवारी) प्राप्त होणार आहेत. या औषधाचे परिणाम पाहून आणखी औषधाची मागणी करायची की नाही याचा निर्णय घेणार असल्याची माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली. तर पुढील आठवड्यात सोलापुरात कोरोनाच्या तपासणीसाठी नवीन मशीन खरेदी करण्यात आली आहे. सोलापुरात ही मशीन दाखल झाली असून लवकरच त्यावर तपासणी सुरु केली जाणार आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोना तपासणीची क्षमता आणखी वाढणार आहे.
Solapur Beedi Protest | सोलापूरमधील विडी कामगारांचं धरणं आंदोलन मागे, पालिका आयुक्तांचं लेखी आश्वासन