याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसंच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतलेत. आता मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी 8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.
मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. सोबतच ते 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने जे या बैठकीला आणि कार्यक्रमाला हजर होते त्यांच्यात भीतीचे वातावरण असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ बैठकीला आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर मंत्री तसेच अधिकारी यांची कोरोना चाचणी केली जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच आता पुढच्या कॅबिनेटवर देखील प्रश्न चिन्ह आहे.
दरम्यान स्वतः धनंजय मुंडे तसेच त्यांच्या ऑफिसने ते गेल्या काही काळात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले अशा मुंबई आणि परळीत फोन करुन सर्वांना टेस्ट आणि क्वारंटाईन होण्यासाठी सूचित केले आहे.
राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद
राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.