बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे राज्यातील अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या 52 वर्षांपासून सुरू असलेला विदर्भातील सर्वात मोठा व शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेला बुलडाण्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. ही माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानादारे प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.


या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे की, जागतिक कोरोना संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्वच हतबल झाले आहेत. वारीच्या प्रसंगी सर्व अडचणी लक्षात घेता, श्री क्षेत्र पंढरपूर येथे संस्थानची कायम शाखा झाली आहे. श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन नित्य पूजाअर्चा, सोपस्कार व नियमाप्रमाणे कार्यक्रम केल्या जातात. पंढरीनाथांच्या चरणो नित्य सेवा भक्तिभावाने कायम होत आहे. त्यामुळे श्री पालखी सोहळा रहित करण्यात आला आहे. अशाप्रसंगी श्री पालखी (श्री पादुका) पंढरपुरास नेणे उचित ठरणार नसल्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी या पत्रकात म्हटले आहे.


यंदा वारकऱ्यांविना आषाढी करण्यासाठी प्रशासन सज्ज, शहरातील मठ, धर्मशाळांची तपासणी


गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 51 वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा 52 वं वर्षे होते. श्री संत गजानन महाराजांची पालखी एकूण 61 दिवसांचा पायी प्रवास करते. यात 650 वारकरी सहभागी असतात आणि जवळपास 750 किलोमीटरचा पालखीचा प्रवास असतो. या पालखी सोहळ्यात टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत 725 कि.मी. आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा 550 किलोमीटर आहे. असा एकुण प्रवास 1275 किलोमीटरचा आहे.


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केवळ पाच पालख्यांना पंढरपुरला प्रतिकात्मक रुपात जाण्याची परवानगी दिली आहे. या पाच पालख्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पालख्यांचा समावेश आहे. मात्र, विठ्ठलाचं 'सासर' आणि रुक्मिणीचं 'माहेर' असलेल्या विदर्भातील एकाही पालखीचा यामध्ये समावेश नाही. विशेष म्हणजे रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील ऐतिहासिक पालखीलाही सरकारनं पंढरपुरात जाणाऱ्या पालख्यांमध्ये स्थान दिलेलं नाही. त्यामुळे रुक्मिणी संस्थानच्या 425 वर्षांच्या पालखीची पंरपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत.


Corona Effect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा रद्द