मुंबई : संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या N95 मास्क आवश्यक बनलेला आहे. ही गरज ओळखून यावरही नफेखोरी मिळविण्यासाठी या मास्कची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून N95 मास्कची किंमत 4 महिन्यात 250 टाक्यांनी वाढली. मात्र, त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आलेले नाही. परिणामी एन95 मास्कचा काळाबाजार वाढत आहे.


संपूर्ण देशात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना सांगितल्या जात होत्या. यामध्ये स्वच्छतेसोबत आपल्या चेहरा झाकण्यासाठी एन95 मास्क गरजेचा असल्याचेही सांगण्यात आलं. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली. शासनाला सप्टेंबर 2019 ला N95 मास्क 12 रुपये 25 पैशांना उपलब्ध होत होते. तर जानेवारी 2020 मध्ये हेच मास्क 17 रुपये 33 पैशांना मिळू लागले आणि मार्चच्या शेवटी पर्यंत 42 रुपयांना हे मास्क मिळू लागले. त्यानंतर मे महिन्याच्या मध्यावधीला 63 रुपयांना हे मास्क उपलब्ध झाले होते.


मास्क लावायला सांगितल्याने महिलेचा पोलिसांना चावा, महिलेविरोधात गुन्हा दाखल


मास्कच्या किमतीत तीन महिन्यांत 250 टक्क्यांची वाढ
जानेवारीच्या सुरुवातीपासून मास्कच्या खरेदीमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये 250 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भारतीयांची गरज ओळखून सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात N95 मास्कची निर्मिती केलेली आहे. मात्र, हे मास्क योग्य दरामध्ये शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर असल्यामुळे नागरिकांना हे मास्क घेणे सध्या परवडत नाही. तसेच काही ठिकाणी या मास्कचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ते उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाने आपले लक्ष केंद्रित करावं आणि या मास्कच्या मागून जो काळा बाजार सुरू आहे याच्यावर नियंत्रण आणावं अशी मागणी होत आहे.


दिवसेंदिवस N 95 मास्कच्या किमती गगनाला भिडू लागल्यामुळे याची किंमत नियंत्रित असावी यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. वैद्यकीय वस्तुंच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नॅशनल फार्मासिटिकल प्राईसिंग ऑथॉरिटी (NPPA) काम करत असते. त्यांनी मास्कचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी भारतातील मोठ्या 6 उत्पादकांना 21मे राजी नोटीस काढून N95 मास्कचे दर निश्चित ठेऊन ते कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. सर्व कंपन्यांचे एकच दर असावेत तसेच सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांमध्ये मास्क विक्रीसाठी उपलब्ध करावेत, अशा सूचना यामध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही महत्त्वाच्या कंपन्यांनी आपल्या मास्कचे दर स्वतःहून कमी केलेले आहेत.


एन-95 मास्कच्या दरनिश्चितीबाबत भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश


भारतात तयार होणाऱ्या N95 मास्कच्या किमतीवर जरी नियंत्र आणले, तरीही बाजारात सर्वच ठिकाणी मिळणाऱ्या चायनीज मास्क वर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न भारतीय उत्पादकांना पडलेला आहे. राज्यात तयार होणाऱ्या एन 95 मास्कच्या दरांचे 3 जून रोजी एक दरपत्रक जाहीर झालेलं आहे. शासनाने कमी केलेल्या दरानुसार 95 ते 165 रुपयांपर्यंतचा दर निश्चित करण्यात आलेले आहेत. सध्या कमी केलेले दर पत्रक हे जानेवारी महिन्यातच्या तुलनेत 450 ते 850 टक्के अधिक आहेत. NPPA मार्फत उत्पादक आणि वितरकांना सूचना मिळाल्यानंतर 47 टक्के या उत्पादकांच्या दरामध्ये घट झालेली आहे. साधारण ही घट 23 ते 41 टक्क्यांनी झाल्याचं निदर्शनास येत आहे. जानेवारी महिन्यात N95 मास्कची किंमत होती त्यापेक्षा सध्या दहापटीने ही किंमत कमी झालेली आहे. बाजारातील चायनीज N95 मास्क वर बंदी आणत सर्व भारतीय कंपन्यांच्या N95 मास्कचे दर एकच ठेवले तरच सामान्य ग्राहकांच्या हिताचा निर्णय होणार आहे.


प्रतिक्रिया


जिनेश दवे (वितरक चिराग सर्जिकल )


राज्यातले सर्व मास्क उत्पादक आपल्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तयार आहेत. उत्पादकांकडून वितरकांकडे व्यवस्थित मालाचा पुरवठा देखील होत आहे. मात्र आमच्याकडून जेव्हा दुकानांमध्ये हे मास्क विक्रीसाठी जात आहे. त्या ठिकाणी मात्र आमच्या मास्कला पर्याय म्हणून चायनीज मास्क ही विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. या चायनीज आणि बेभरवशाच्या मास्कवर विक्रेत्यांना जास्त नफा मिळत असल्यामुळे चायनीज मास्कची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर राज्यातले मास्क उत्पादक मोठ्या अडचणीत येतील. त्यामुळे शासनाने या सर्वांवर नियंत्रण ठेवत चायनीज वस्तू आणि मास्क बाजारातून हद्दपार करणं हेही तितकंच गरजेचं आहे.



अभय पांडे (ऑल ड्रग अँड फुड्स लायसन होल्डर प्रेसिडेंट )


N95 हे मास्क सध्या वैद्यकीय क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे आहेत. तसेच कोरोना विषाणू सारख्या परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र हे मास्क शेवटच्या घटकापर्यंत योग्य दरामध्ये पोहोचत नाही. मास्कचे दर वाढवून त्याची विक्री करणे हे जसे ग्राहकांची लूट करण्यासारखा आहे. तसेच परदेशी आणि विशेषत: चायनीज मास्क विक्री होत असल्यामुळे काही घटकांकडून ग्राहकांची दिशाभूल होत आहे. राज्य शासनाने सुरुवातीला चायनीज मास्क बाजारातून हद्दपार करावेत आणि राज्यातल्या दर्जेदार मास्क ना प्राधान्य द्यावं अशी मागणी आम्ही करत आहोत.


KEM Hospital | केईएममध्ये 7 कोरोना बाधितांचे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात न घेतल्यानं शवाघरात पडून