गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. याचा मोठा फटका फळबागा आणि रब्बी पिकांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळींब अशा फळबागांचं मोठं नुकसान झालंय. तर, गहू, हरभरा, मका या पिकांचीही खराबी झालीय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. परभणी, सांगली, लातूर, धुळे, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलंय. सोबतच शेकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही कदम यांनी दिले आहेत.
शेतकऱ्याचा पाय खोलात! आधी कोरोना अन् आता गारपीट
कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका
देशभरात कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. यातून शेतकरीही सुटला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्यातबंदी, कृषिबाजार समित्याबंदी घेण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा शेतीमाल कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पडून आहे. अनेक ठिकाणी निर्यातबंदी असल्याने द्राक्ष थंडकक्षात ठेवण्यात आले आहे. परिणामी एककडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे बाजारबंदी असं दुहेरी नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागत आहे. तर, याच कोरोनामुळे शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या कर्जमाफीही थांबवण्यात आली आहे. त्यामुळे तिकडूनही शेतकऱ्यांची मदत थांबली आहे.
मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान
या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका
परभणी जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. गारपीटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. रब्बी हंगामात तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पीक हातून गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय. काल रात्री अडीच ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील पुर्णा, पालम, गंगाखेड, सेलु, तसेच परभणी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात काढणीला आलेला गहु, हळद, ज्वारी, चारा पीक पूर्णपणे आडवी झाली आहेत. तर नुकतेच वाढ होत असलेल्या मोसंबी, आंबा, आदी फळपिक ही गळुन पडल्याने हजारो हेक्टर वरील नुकसान झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर परिसरात गेल्या पाच ते सात वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. मात्र, अवकाळी पावसात गारा पडण्याचे प्रमाण या दोन ते तीन वर्षांत वाढले आहे. द्राक्ष काढणी हंगाम आणि अवकाळी पाऊस हे समीकरण बनल्याचे चित्र या पावसामुळे बनले आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात खानापूर, बेणापूर, हिवरे, सुलतानगादे परिसरात हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा खानापूर घाटमाथ्यावरील द्राक्षबागा, गहू, हरभरा तसेच भाजीपाला पिकांना बसला आहे.
उन्हाळ्यात शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट; विदर्भात वादळी पावसाचा इशारा
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा, हिंगोली या पाचही तालुक्यामध्ये अवकाळी पावसात सोबतच गारांचा पाऊस पडला. यामध्ये शेतातील, गहू, हरभरा, भाजीपाला यासह बागायत संत्रा, मोसंबीला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. दहा वाजता अचानक झालेल्या गारपीटीने सर्व जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अवकाळीमुळे संकटात सापडला आहे. कापून ठेवलेले गहू, हरभरा, तसेच उकळून ठेवलेली हळद झाकण्यासाठी मध्यरात्रीच धांदळ उडाली. अचानक पावसाला सुरुवात झाल्याने घराकडे परतण्याच्या गडबडीमध्ये अनेक ठिकाणी अपघात घडण्याच्या घटना घडल्या.
जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज पुन्हा गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव तालुक्यातील जुवार्डी, आडळसे, पोहरे दंस्केबर्डी, नावरे, बहाळचा काही भाग याठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. यात लिंबू बागा अक्षरशः मोडून पडल्या आहेत. गुढे परिसरात सर्वाधिक लिंबूचे उत्पादन घेतलं जातं. यात यावर्षी जास्त प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे लिंबू बागांना फटका बसला होता.
#Coronavirus | येत्या दहा पंधरा दिवसांत आठ ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु करणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे