मुंबई : राज्यावर सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झालेल्या गारपीटीमुळे मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झालंय. तर, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. यात वाशिम, यवतमाळ, परभणी, जालना, जळगाव, अमरावती, वर्धा, धुळे, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.


गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना अवेळी येणाऱ्या पावसाचा सामना करावा लागत आहे. मागील आठवड्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले होते. त्या संकटातून बाहेप पडत असताना पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. यात बऱ्याच ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाल्याने फळबागांना फटका बसला आहे.

अमरावती
मंगळवारी रात्री अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात गारपीटसह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. तर, आज सकाळी पुन्हा तिवसा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार तालुक्यामधे वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे केळी, गहू, संत्रा, हरभरा पिकांचे मोठं नुकसान झालंय. तर, वाशिम जिल्ह्यात पुन्हा एकवेळा पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे रब्बीमध्ये उशिरा पेरणी करणारा आणि पीक काढणी करणाऱ्या शेतकऱ्याला मोठा फटका बसणार आहे.

Unseasonal rain | मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा; ज्वारी, हरभरा, गव्हाचं मोठं नुकसान
वर्धा
वर्धा जिल्ह्याच्या वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, समुद्रपूर, देवळी, सेलू तालुक्याला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसला. तर, काही भागात बारीक गारा पडल्याची माहिती मिळत आहे. तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाोने हजेरी लावली. यावेळी विजांचाही जोरदार कडकडाट होत होता. परिणामी काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला. तर, काढणीला आलेल्या गहू, हरभरा आदी पिकांचं नुकसान झालं. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला. तर, उज्जैनपुरी, हिवरा राळा, अन्वी परिसरात पावसाबरोबर गारा बरसल्या. यामुळे गहू, डाळिंब, मोसंबी, मका, आंबा आदी पिकांचे नुकसान झालं.

धुळे
जिल्ह्यातील शिरपूर शहर, तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान अर्धातास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे शेती मालाचे तसेच पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने केळी, पपई, टोमॅटो, कापूस, गहू, हरबरा, कांदा या पिकांचं नुकसान झालंय. लिंबूच्या आकाराच्या गारांच्या माऱ्यामुळे शिरपूर शहरातील काही घरांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटल्याच्या घटना घडल्या. तर, परभणी जिल्ह्यात सेलु, पाथरी, परभणी तालुक्यात वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढलेल्या गहु, हरभऱ्यासह फळबागाना याचा फटका बसला. हिंगोलीतही वादळी वारा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्री पाऊस झाला.

अवकाळी पावसाचे विधानसभेत पडसाद; देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले...

जळगाव
जिल्ह्यातील भुसावळ बोदवड जामनेर या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळीपाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीट ही झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. तर, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर आणि पुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी गारांचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक पिकांचं नुकसान झाले आहे. अमरावतीत चांदूर बाजार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने गहू, संत्रा, हरभरा पिकांचे नुकसान झालंय. तर, अमरावती शहरात वारा आणि विजांच्या कटकडाटासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे अनेक भागांची बत्ती गुल झालीय.

यवतमाळ
जिल्ह्यात राळेगाव आणि बोथबोडन, कीन्ही अर्जुना भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला. तर, जिल्ह्यातील राळेगाव आणि बोथबोडण भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा पिकाच मठं नुकसान झाले आहे. आज सायंकाळी राळेगाव भागात जवळजवळ अर्धातास धुव्वाधार अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बोथबोडन भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तिकडे वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर मालेगाव तालुक्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचं तसेच संत्रा, आंबा पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Rural News | भंडाऱ्यात अवकाळी पाऊस | माझं गाव माझा जिल्हा | ABP Majha