मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगर इथे कोरोना पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले आहेत. एकट्या पुण्यात कोरोनाचे 19 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे.


युनायटेड किंग्डमवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, उल्हासनगर इथल्या 49 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला नुकतीच दुबईहून परतली आहे.


राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती

पुणे - 8
पिंपरी चिंचवड - 11
मुंबई - 10
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड - 1
ठाणे - 1
अहमदनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी- 1

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 166 झाली आहे. तर कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे.

राज्यात आठ नव्या लॅब सुरु करणार : राजेश टोपे
राज्यात कोरोना व्हायरस संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या 15 दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (18 मार्च) दिली. तसेच आजपासून तीन ठिकाणी कोरोना व्हायरसची तपासणी सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई अंशत: लॉक डाऊन
कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळाल्यावरच ते शक्य होईल. यासाठी बुधवारी (18 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इटलीमध्ये एका दिवसात 475 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत जात आहे. सध्या याचा सर्वाधित परिणाम इटलीमध्ये दिसून येत आहे. इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत दोन हजार नऊशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढचं नाहीतर इटलीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 4,207 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे इटलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 35 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

Coronavirus | कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई आजपासून अंशत: लॉकडाऊन, 50 टक्के दुकानं बंद