...बंदूक मात्र, आमच्या खांद्यावर ठेवली याचं वाईट वाटतंय; बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली खंत
Balasaheb Thorat LIVE in Vidhan Sabha Session : सर्व आमदारांसह सूरत, गुवाहाटी कुठे फिरलात? यामध्ये मी जात नाही. सगळं होत असताना बंदूक मात्र, आमच्या खांद्यावर ठेवली याचं वाईट वाटतं, बाळासाहेब थोरात यांच्याकडून खंत व्यक्त.
Balasaheb Thorat LIVE in Vidhan Sabha Session : राज्यात स्थापन झालेल्या नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला 164 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि विधानसभेतील बहुमत चाचणीत विजय मिळवला. शिवसेनेतून बंडाळी करत बाहेर पडलेल्या शिंदे गटाचा हा विजयच म्हणायचा. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. यावर बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं. तसेच, एक पक्षाचं सरकार असतानाही कुरबुरी असतात. आमचं सरकार तर तीन पक्षांचं होतं, तरीही चांगलं काम. तिन्ही पक्षांनी कधीच टोकाची भूमिका घेतली नाही. आपण जनतेसाठी आहोत, हे विजयाच्या उन्मादात विसरु नका, असा टोलाही नवनिर्वाचित सरकारला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे.
बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध केल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की, "सर्व आमदारांसह सूरत, गुवाहाटी कुठे फिरलात? यामध्ये मी जात नाही. सगळं होत असताना बंदूक मात्र, आमच्या खांद्यावर ठेवली याचं वाईट वाटतं, अशी खंत थोरात यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली.
सरकार कसं आलं हे सर्वांना माहिती आहे. सत्तेत आल्यानंतर तुम्ही आरे मेट्रो कारशेडचा निर्णय लगेच घेतला. त्यावर आंदोलन सुरु असून त्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही गुवाहाटीत होता, त्यामुळे माहीत नसेल, पण इथे दुष्काळ पडलाय. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पाऊसच नाही ही अवस्था राज्याची आहे, दुबार पेरणीची वेळ आलीये. त्यावर चर्चा करायला हवी होती. पण सत्तेच्या खेळात दुर्लक्ष झालंय, अशीही खंत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कामांबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, "कोरोनामुळे आर्थिक निधी उपलब्ध होत नसताना एकीकडे जनतेला मदत करत होतो आणि महत्वाची कामंही सुरु होती. कोस्टल रोड, मेट्रो, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळच्या कामात कुठेही कमी पडलो नाही." एका पक्षाचं सरकार असलं तरी कुरघोडी, दबाव, समस्या असतात. महाविकास आघाडीत आम्ही संयमानं भूमिका घेत होतो."
"कोरोनाचं संकट आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत होतो. कोरोनामध्ये दोन वर्ष गेली, हे लक्षात घेतलं पाहिजे. पाच वर्षांचाच सरकारचा कार्यकाळ असतो. मुंबई कशी सांभाळली? याचं जागतिक पातळीवर कौतुक झालंय. आम्ही कोरोना संकटात राज्यही योग्य पद्धतीनं सांभाळलं. सामान्य माणूस हे कधीच नाकारणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनी चांगलं उदाहरण घालून दिलंय.", असंही थोरात यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीसाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला हे खरंय. सत्तेत आल्यानंतर आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामाचा मी उल्लेख करणार आहे, असं बाळासाहेबांनी सांगताच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला. यावर बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आणि शिस्त पाळली जावी असं सांगितलं.