ISCE, ISC बोर्ड परीक्षेसाठी कोरोना लसीची सक्ती, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; वर्षा गायकवाड म्हणाल्या...
कोरोनाची लस गरजेची असली तरी ज्या विद्यार्थांनी ती घेतली नाही त्यांना परीक्षेला न बसू देण्याची भूमिका ही भेदभाव करणारी असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मुंबई: ISCE, ISC बोर्ड परीक्षेसाठी अवघे चार दिवस राहिले असताना बोर्डच्या एका निर्णयावरून आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत त्यांना परीक्षेला बसता येणार नाही असं CISCE बोर्डाने स्पष्ट केलं आहे. त्यावर आता या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावं, त्यांच्याशी भेदभाव करू नये अशी मागणी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्राकडे केली आहे.
CISCE बोर्डने 4 जानेवारी रोजी काही सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये सांगितलं होतं की 25 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या ISCE आणि ISC बोर्ड परीक्षेसाठी कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असतील. त्याच नियमाला धरुन आता काही शाळांनी सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही पूर्ण झाले नाहीत त्यांना या परीक्षेला बसता येणार नाही.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, "ISCE बोर्डचे काही विद्यार्थी आपल्याकडे आले. या आधी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक अॅफिडेव्हिट दाखल केलं होतं, त्यामध्ये परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोरोना लस बंधनकारक नसेल असं स्पष्ट केलं होतं. पण तरीही CISCE ने या प्रकारची वेगळी भूमिका घेतली आहे."
Some students of the ISCE board have reached out to me regarding an advisory, dated Jan 4, 2022, issued by the
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 21, 2022
CISCE, mandating Covid vaccination for all those appearing for the ISCE and ISC exams starting April 25th.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, "कोरोनाची लस घेणं हे आरोग्यासाठी महत्त्वाचं असलं, त्यामुळे जीवाची शाश्वती असली तरी ही लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याची भूमिका ही भेदभाव करणारी आहे. त्यामुळे देशाच्या शिक्षणमंत्र्यांना आणि CISCE बोर्डला माझी विनंती आहे की या प्रकरणी लक्ष घालावं आणि तात्काळ स्पष्टीकरण द्यावं. या प्रकरणी राज्याच्या शिक्षण विभागाने या आधीच CISCE बोर्डशी संपर्क केला आहे."