मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रकोप हळू हळू कमी होऊ लागला आहे. यामुळं सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलला देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणं गरजेचं आहे. यासाठी तसे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सोबतच विमानतळांवरही लस घेतल्याचं प्रमाणपत्र मागितलं जात आहे. यावर उपाय म्हणून एका पठ्ठ्यानं लसीचं प्रमाणपत्र टी शर्टवर प्रिंट करुन घेतलं आहे. हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 


CM Uddhav Thackeray on Covid19: 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री


स्टॅंडअप कॉमेडीयन असलेल्या अतुल खत्रींनी त्यांचा असा टीशर्ट घातलेला फोटो ट्वीट केला आहे.   पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमधील खत्रींचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. अतुल खत्रींनी घातलेल्या टी-शर्टवर कोरोना प्रमाणपत्र प्रिंट करण्यात आलं आहे. 






ही आयडिया कशी सुचली याबद्दल त्यांनी या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, काम आणि प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विमानतळ, हॉटेलमध्ये वारंवार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवून कंटाळल्यानं ही आयडिया सुचली. 



15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली.  ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस  घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.