मुंबई : काल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. मात्रं प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे रात्री 8.30 वाजता कोविड टास्क फोर्ससोबत बैठक करणार आहेत. या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. हॉटेल्सला देखील रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळावी यासंदर्भात आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीत भूमिका मांडणार असल्याचं मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. 


टास्कफोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
मुख्यमंत्री काल म्हणाले होते की, रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थनास्थळे याबाबत  टास्कफोर्सशी चर्चा करून  निर्णय घेऊ. महाराष्ट्रातील जनतेने राज्य शासनाला आतापर्यंत सहकार्य केले म्हणूनच मुंबई मॉडेलचे, महाराष्ट्राचे कौतूक जगभर झाले. याचे सर्व  श्रेय माझे नसून राज्यातील जनतेचे  असल्याचेही ते म्हणाले होते.


CM Uddhav Thackeray on Covid19: 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री


काही ठिकाणी निर्बंध शिथील पण...
राज्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बीड, पुणे, सांगली अशा काही  जिल्ह्यात अजून कोरोना संसर्ग वाढता आहे ते जिल्हे सोडून उर्वरित ठिकाणी काही निर्बंध शिथील केले आहेत. कोरोनामुक्त गावासारखी संकल्पना आपण राबवित आहोत. अनेकांनी यादिशेने योग्य पाऊले टाकायला सुरुवातही केली आहे. उद्योजक, कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळा बदलून शिफ्टमध्ये कामगारांना बोलवावे, शक्य असलेल्या कंपन्यांनी  त्यांच्या कामगारांची राहण्याची सोय त्यांच्या कॅम्पसमध्येच करावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.



15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली.  ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस  घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.