मुंबई :  ज्वारी, हरभऱ्याचं पीक काही ठिकाणी अगदी पोटऱ्यात असताना, तर कुठं खळं सुरू असतानाच अवकाळी पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. रविवारी सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं ज्वारीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. तर, आज सकाळी पुन्हा लातूर, परभणीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलंय.


परभणी जिल्ह्यात आज सकाळी विजांच्या कडकडाटासह सर्वत्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पाऊस जोरदार पडला नसला तरी वाऱ्यामुळे फळबागांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतीय. तर, लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसाने गहू, हरभरा आणि आंब्याचं नुकसान झालं आहे. पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याचप्रमाणे बाजरात आणलेल्या पिकांचंही मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं.

तातडीनं पंचनामे करण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश -

बीड जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. या नुकसान भरपाई नुकसानीची पाहणी करून त्याबाबत मदतीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर, नगर जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर वर्ध्यातील 46 हजार शेतकऱ्यांना लाभ

बाजार समीतीतील तूर, हरभरा भिजला -
सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अवकाळी पावसामुळे सुमारे 8 ते 10 हजार तूर आणि हरभऱ्याची पोती भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे. सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेली तूर आणि भरभऱ्याची हजारो पोती भिजली. काल रविवार असल्याने बाजर समितीत लिलाव बंद होता. त्यामुळे कोणत्याही आडत दुकानात हमालही उपस्थित नव्हते. अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. मात्र, अवकाळी पावसामुळे बाजारात आणलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मुलाकडून शाळेत 'बळीराजा नको करु आत्महत्या' कविता सादर, त्याच रात्री पित्याची आत्महत्या

राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका -
रविवारी राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात अकोला आणि वाशिम जिल्ह्यात पाऊस झाला. वाशिममधल्या शेलू बाजार परिसरात सरी कोसळल्या. ऐन रब्बी हंगामाच्या पीक काढणीवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं पिकाला मोठा धोका निर्माण झालाय. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातही धुंवाधार पाऊस झाला. परिणामी येथील गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या हृदयात धडकी भरलीय. तर नाशिकच्या नांदगावमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीठही झालीय. त्यामुळं उघड्यावर असलेला कांदा भिजल्यानं शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्येही जोरदार पावसानं हजेरी लावलीय. गडहिंग्लज, आजरा, चंदगडमध्ये पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं आंबा, काजूच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Nonseasonal Rain | मनमाडमध्ये काही भागत गारपीट, कांदा, हरभरा आणि ज्वारीचं नुकसान