अहमदनगर : शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून तिसरीतल्या एका मुलाने एक कविता रचली आणि शाळेत सादर केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच दिवशी त्याच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.


पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या ठिकाणी हनुमाननगर येथे तिसरीच्या वर्गात प्रशांत बटुळे हा विद्यार्थी शिकतो. प्रशांत बटुळेने बुधवारी (26 फेब्रुवारी) आपल्या शाळेत 'अरे बळीराजा नको करु आत्महत्या' ही कविता सादर केली. शेतकऱ्याने आत्महत्या करु नये यासाठी त्याने ही कविता रचली होती. मात्र त्याच रात्री त्याचे वडील मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.

मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालं. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

प्रशांतच्या कवितेतल्या काही ओळी
शेतात कष्ट करुनही तुझ्या डोक्याला ताप,
बळीराजा नको करु आत्महत्या..
पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरे,
कसे उन्हात करतात शेती, पिक उगवणी करुन मिळतात पैसे
शेती करुनही तुझ्या हाताला फोड
अरे बळीराजा नको करु आत्महत्या