अभाविपच्या संस्थापकांचा जन्मशताब्दी कार्यक्रम साजरा करा, UGC चं पत्र, ठाकरे गटाच्या युवा सेनेचा आक्षेप
दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना यूजीसीने पत्राद्वारे दिल्या आहेत.
Dattaji Didolkar : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) अर्थात अभाविपचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर (Dattaji Didolkar) यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयात साजरा करण्यासंदर्भात युजीसीने (UGC) परिपत्रक काढलेय. यावर ठाकरे गटाच्या युवा सेनेने आक्षेप घेतला आहे. मुंबई विद्यापीठाचे (mumbai university) माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत (Pradeep Sawant) यांनी आक्षेप नोंदवला.
युजीसीने पत्रात काय म्हटले ?
दत्ताजी डिडोळकर यांचे कार्य हे देशातील तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना यूजीसीने पत्राद्वारे दिल्या आहेत.
मंत्री गडकरींचे पत्र -
डिडोळकर यांची जन्मशताब्दी सर्व विद्यापीठात आणि महाविद्यालयात साजरी करण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक डिडोळकर यांचं तरुणांसाठी आणि समाजासाठी केलेले कार्य हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यत पोहचावे या उद्देशाने त्यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम विद्यापीठ आणि महाविद्यालयात साजरा केला जावा हे त्या मागचे उद्दिष्ट आहे, असे पत्रात नमूद केलेय.
युजीसीच्या निर्णायावर ठाकरे गाटाच्या युवा सेनेचा आक्षेप -
सात ऑगस्टला नागपूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी यूजीसीच्या या पत्रावर ठाकरे गटाच्या युवा सेनेने आक्षेप घेतला आहे, यूजीसी एक प्रकारे आरएसएससाठी काम करत आहे का ? असा सवाल युवा सेनेकडून विचारला गेला आहे. जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यावर आमचा विरोध नाही, पण अशा प्रकारे हा कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा आरएसएस च्या फंडातून साजरा केला जावा, असे प्रदीप सावंत म्हणाले. हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांना खर्च करावा लागणार आहे, त्यामुळे हे पत्र मागे घ्यावे अशी मागणी युवासेनेने युजीसीकडे केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यासंदर्भात यूजीसीला पत्र लिहून जाब विचारणार आहेत.
दत्ताजी डिडोळकर यांच्याबद्दल -
दत्ताजी डिडोळकर हे अभाविपच्या संस्थात्मक स्थापनेच्या प्रक्रियेतील एक प्रमुख कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिणेतील प्रचारक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वाढीमध्ये दत्तात्रेय डिडोळकर यांचा मोठा वाटा होता.