मोठी बातमी : कल्याण, ठाणे ते धाराशिव, हातकणंगले, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा, ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या!
Shiv sena, Lok Sabha Election : इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागावटपामध्ये शिवसेना 23 जागांवर ठाम आहे.
Shiv sena, Lok Sabha Election : इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागावटपामध्ये शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी या 23 जागांवर ठाम आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्मुलाही समोर आलाय. 23 शिवसेना, 15 राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि 10 काँग्रेस असा फॉर्मुला समोर आलाय. शिवसेनेने मुंबई 4, पश्चिम महाराष्ट्र 3, कोकण 2, ठाणे 2, पालघर 1, विदर्भ 4, मराठवाडा 5, उत्तर महाराष्ट्रातील एका जागेवार दावा केलाय.
राज्यातील अशा कुठल्या 23 जागा आहेत ज्यावर ठाकरे गट ठाम आहे ?
1) रामटेक
2 ) बुलढाणा
3) यवतमाळ वाशीम
4) हिंगोली
5) परभणी
6) जालना
7) संभाजीनगर
8) नाशिक
9) पालघर
10) कल्याण
11) ठाणे
12) मुंबई उत्तर पश्चिम
13) मुंबई दक्षिण
14) मुंबई ईशान्य/शिरूर
15) मुंबई दक्षिण मध्य
16) रायगड
17) रत्नागिरी सिंधुदुर्ग
18) मावळ
19) शिर्डी
20) धाराशिव
21) कोल्हापूर
22) हातकणंगले - ( स्वाभिमानी शेतकरी संघटनासाठी सोडू शकतात)
23) अकोला - (वंचित बहुजन आघाडीसाठी सोडू शकतात) (शिवसेना आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोला जागा वंचितला देण्याची तयारी )
तर शिरूर ची जागा राष्ट्रवादीसाठी सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. जागावाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांवर फेरफार होऊ शकतो, मात्र या 23 जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची नेत्यांची माहिती आहे.
23 जागांवर शिवसेना ठाम -
कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलेलं आहे. जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. त्यांची मदत घेऊ. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दिल्लीमध्ये ठरणार आहे. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. उद्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. मतभेद असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले. संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीमध्ये, आम्ही त्यांच्याशी चर्चा करु असाही टोला राऊतांनी यावेळी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना दिला.
दिल्लीत हायकमांडसोबत पहिली बैठक
लोकसभा जागावाटपाची अंतिम चर्चा ही हायकमांडसोबतच होईल, असे काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. आज दिल्लीत हायकमांडसोबत पहिली बैठक आहे. सगळ्याचं ऐकून घेतलं जाईल. आम्ही आमची बाजू मांडू. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आहेच. इतर कुणाला सोबत घ्यायचे यासंदर्भात चर्चा करू. किती जागा हव्या त्याबद्दल मी बोलणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत जे ठरेल त्यावरच अंमल करू, असे वडेट्टीवार म्हणाले.