शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचाय : उद्धव ठाकरे
कुणी कुणाशी युती केली तर कुणाची टक्केवारी वाढेल याची मला चिंता नाही. मात्र देशाची आर्थिक टक्केवारी कशी वाढेल याची मला चिंता आहे. त्यामुळे 2019 च्या पुढे फक्त शिवसेनाच असणार आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
मुंबई : शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे. आम्हाला कुणी लेचेपेचे समजू नये, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या "पटक देंगे..." या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत आयोजित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते.
कित्येक लाटा आल्या आणि गेल्या पण शिवसेना सगळ्यांची वाट लावते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारचा समाचार घेतला. कुणी कुणाशी युती केली तर कुणाची टक्केवारी वाढेल याची मला चिंता नाही. मात्र देशाची आर्थिक टक्केवारी कशी वाढेल याची मला चिंता आहे. त्यामुळे 2019 च्या पुढे फक्त शिवसेनाच असणार आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
सरकार मजबूर नसेल तरी चालेल पण माझा देश मजबूत असला पाहिजे. गांधी-नेहरुंपासून सगळे पाढे काढा आणि बघा मजबूत सरकार कसं होतं आणि मिली जुली सरकार कसं असतं. शत्रूच्या छाताडावर नाही तर देशाच्या छाताडावर बसणारा पंतप्रधान असेल, तर असं मजबूत सरकार काय चुलीत घालायचं का? असा सवाल करत उद्धव ठाकरेनी मोदींवर निशाणा साधला.
आज देशात काय चाललंय याकडे दुर्लक्ष करुन निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं पाप माझ्याकडून होणार नाही. जनतेच्या मनातला विश्वास जिंकला तर युद्ध जिंकू. विश्वास नसेल तर तो फुटकळ विजय काय कामाचा? असं बोलून इतर पक्षांच्या निवडणुकांच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.
राम मंदिराच्या मुद्यावरुनही भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंनी घणाघात केला. राम मंदिराचा मुद्दाही निवडणुकीसाठीचा जुमला होता का? आता काँग्रेस राम मंदिराच्या आड येत असल्याचा आरोप करत आहात. काश्मीरच्या मुफ्तीना राम मंदिर हवं होतं का? नितीश कुमारांनी राम मंदिराला विरोध केला होता का? राम मंदिर कोर्टाचा विषय होता तर बाबरी मशिद कोर्टाचा विषय नव्हता का? असे प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला.