Uday Samant: आमचे एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांच्या बाजूला आणि शेवटच्या रांगेतील शिंदेंवर टीका करतात : उदय सामंत
राहुल गांधी यांनी संध्याकाळी निवासस्थानी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना दाखवलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेमध्ये बसल्याचे दिसून आले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल (7 ऑगस्ट) आपल्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांची हजेरी होती. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्याकडून जो सातत्याने मतचोरीचा आरोप होत आहे त्याचेही प्रेझेंटेशन सादर केले. तत्पूर्वी त्यांनी दुपारी प्रेझेंटेशन सादर करत भाजप आणि निवडणूक आयोग देशांमध्ये मतचोरी कशा पद्धतीने करत आहे याची चिरफाड केली होती. तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. मात्र, राहुल गांधी यांनी संध्याकाळी निवासस्थानी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना दाखवलेल्या प्रेझेंटेशनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेमध्ये बसल्याचे दिसून आले. यावरून आता शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका सुरू आहे. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळी शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलने करण्यात आलं. त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या स्थानावरून टीका केली आहे.
शेवटच्या रांगेत बसलेले आमच्या एकनाथ शिंदेंवर टीका करतात
उदय सामंत म्हणाले की जे नेते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले म्हणून टीका करतात त्या नेत्यांना शेवटच्या रांगेत बसवलं जातं हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.ते म्हणाले की आमचे एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते तेव्हा पंतप्रधानाच्या बाजूला बसले होते, उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसून राहुल गांधींचा नाटक बघत होते. शेवटच्या रांगेत बसलेले आमच्या एकनाथ शिंदेंवर टीका करतात. त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्राला कळाले की कोणाची कुवत किती आहे असेही उद्योग उदय सामंत यांनी म्हटलं आहे. इथं युतीवर चर्चा करायची इकडं आघाडीसोबत बोलायचे त्यामुळे हे दिवस आल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
काहीतरी फेक नेरेटिव्ह पसरवलं जात आहे
मतदारयादीवरून बोलताना सामंत म्हणाले की बिहारची निवडणूक आली असल्याने काहीतरी फेक नेरेटिव्ह पसरवलं जात आहे. त्यातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी झाले, काही विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले. जर ईव्हीएमवर शंका असेल तर खासदार आमदारांनी राजीनामा द्यावा, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























