सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार काही ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. यावर सोलापुरातील रेल्वे हॉस्पिटलने अनोखा उपाय शोधला आहे. रुग्णांशी थेट संपर्क येऊ नये यासाठी रोबोची निर्मिती करण्यात आली आहे.


सोलापुरातील डॉ. कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. जिथे रुग्णांवर उपचार केले जात आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा रुग्णांशी थेट संपर्क टाळण्यासाठी अनोखा रोबो तयार करण्यात आला आहे. रेल्वेच्या मॅकॅनिकल डिव्हिजनतर्फे या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे.


या रोबोमध्ये रुग्णांशी बोलण्यासाठी, त्यांना पाहून संपर्क करण्यासाठी टू व्हे व्हिडिओ कॉलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. रोबोच्या समोर ट्रे आहे ज्यात औषधे, जेवण यासारख्या गरजेच्या गोष्टी देण्यात येतात. जेणेकरुन वैद्यकीय कर्माचाऱ्यांचा कमीत कमी संपर्क रुग्णांशी येऊ शकेल.


विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसात या रोबोची निर्मिती करण्यात आली आहे. सोलापुरातल्या रेल्वेच्या मेकॅनिकल विभागातच याची निर्मिती करण्यात आली आहे. या अनोख्या रोबोला 'सारथी' असे नाव देण्यात आले आहे.


सोलापुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जातोय. आज मंगळवारी पुन्हा 10 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोलापूरात 145 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 9 जणांचे बळी गेले आहेत. काल सोमवारी रात्री उशीरा 63 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.


सोलापूर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. हे सर्व परिसरात कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान आज आढळलेल्या रुग्णापैकी एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे. या आधी सांगोला, मोहोळमधील प्रत्येकी एका रुग्णास कोरोनाची लागण झाली होती. तर आज दक्षिण सोलापुरातील उळेगाव येथे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापुरात आतापर्यंत 24 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. आज बुधवारी दिवसभरात 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर उर्वरित 112 रुग्णांवर सोलापुरात शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सोलापूरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. शिवशंकर यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली. पी. शिवशंकर मूळचे हैदराबाद येथील असून 2011 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. या आधी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे. सोमवारपासूनच ते सोलापूरात दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाप्रशासनासोबत काम करीत आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर देखील उद्या (गुरुवारी) सोलापुरात येत असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.


संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका