मनसुख हिरण हत्या प्रकरण; लातुरात दोघांना अटक, राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई
लातूर येथून ताब्यात घेण्यात आलेले संतोष शेलार आणि आनंद जाधव हे मनसुख हिरण याची हत्या झालेल्या कार होते असे बोलले जात आहे.
लातूर : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पियो कार प्रकरणी आता आणखी एक कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केली आहे. एनआयएने या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना लातूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
एनआयएने अटक केलेल्या आरोपींची नावं संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी आहेत. या दोन्ही आरोपींना काही दिवसांपूर्वी लातूर येथून अटक करण्यात आली होती. कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची रवानगी 21 जूनपर्यंत NIA कोठडीमध्ये केली आहे. या दोघांचा सहभाग मनसुख हिरेन यांच्या हत्येत आहे का? याचाही तपास केला जाणार आहे.
लातूर येथून या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र लातूर पोलिसांना या दोघांना कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे, याची माहिती नव्हती. ही कारवाई राष्ट्रीय तपास यंत्रणेची आहे. त्याबाबत आम्ही काही सांगू शकत नाहीत, असा खुलासा लातूर पोलिसांनी केला आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कार प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. कारण यानंतर अनेक नाट्यमय घटना घडत गेल्या होत्या. याच काळात मनसुख हिरण यांची हत्या झाली होती. मनसुख हिरण याचा मृतदेह 5 मार्चला मुंब्र्याजवळील खाडीत सापडला होता. ज्यानंतर मनसुख हिरण याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबियांकडून करण्यात आला होता. तपास एटीएस कडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोरे, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांचा समावेश आहे.
लातूर येथून ताब्यात घेण्यात आलेले संतोष शेलार आणि आनंद जाधव हे मनसुख हिरण याची हत्या झालेल्या कार होते असे बोलले जात आहे. मनसुखची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात ते आरोपी आहेत. यातील संतोष शेलार विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. आरे, दहिसर, कुरार, अंधेरी, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. तसेच इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्येचा कट आखणे, मारहाण, खंडणी सारखे गंभीर गुन्हे आहेत.
लातूर पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेस स्थानिक पातळीवर मदत केली, मात्र त्यांना हे कोणत्या प्रकरणातील आरोपी आहेत याची माहिती नव्हती. त्यांना कुठे ताब्यात घेण्यात आले? लातुरात ते कसे आले? लातुरात त्यांना कोण मदत करत होते? याबाबत मात्र उलगडा होऊ शकला नाही.