Tuljapur News: तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण
Tuljapur News: तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांच्या ड्रेस कोडवरून 'यु टर्न' घेतला आहे.
Tuljapur News: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आज सकाळीच तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिले आहे.
तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही असे म्हटले गेले होते.
ड्रेसकोडबाबतचे नियम आजच लागू करण्यात आले. या नियमांची पूर्वकल्पना भाविकांना देण्यात आली नाही. अचानकपणे लागू करण्यात आलेल्या नियमांचा फटका भाविकांना बसला. एका 10 वर्षीय मुलालादेखील सुरक्षा रक्षकांनी दर्शन घेण्यापासून अडवले. त्याच्या पालकांचा संताप एबीपी माझाने दाखवला होता.
भाविकांमध्ये असलेली नाराजी, रोष पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांच्या ड्रेस कोडवरून 'यु टर्न' घेतला. तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी जाहीर प्रकटन काढले. तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दरम्यान, 18 मे रोजी मंदिर आणि मंदिर परिसरात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात बोर्ड लावण्यात आले आहेत. यानिमित्ताने मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन सौदागर तांदळे व सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक नागेश शितोळे यांचा सर्व पुजारी वर्गाने सत्कार करण्यात आला. यावेळी अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक उपस्थित होते.
महिला-पुरुषांसाठी वेगवेगळे नियम
मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट प्ॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीड आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम लागू करण्यात आले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला.