लाच प्रकरणानंतर त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. ल. धारूरकर यांचा राजीनामा
त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. वि. ल. धारुरकर यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता.
औरंगाबाद : त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी प्रमुख डॉ. वि. ल. धारुरकर यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर झालेल्या टीकेनंतर धारुरकर यांनी आपल्या कुलगुरुपदाचा राजीनामा दिला आहे. इंग्रजी वर्तमानपत्रात धारुरकर यांची यासंबंधीची बातमी छापून आली होती.
राजीनामा दिल्यानंतर धारुरकर यांनी प्रतिक्रिया दिली, "माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, बदनामीकारक वातावरण निर्माण केल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. त्रिपुरा विद्यापीठातील अनेक लोकांमध्ये महाराष्ट्रविरोधी वातावरण आहे. गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात मी विद्यापीठाचा महसूल चार कोटींवरून 12 कोटींवर नेला होता. विद्यापीठातील काही लोकांना विद्यापीठाची ही प्रगती सहन होत नव्हती. त्यांनी मला विनाकारण लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्रिपुरा विद्यापीठाने याप्रकरणी धारुरकर यांची बाजू घेतली आहे. विद्यापीठाने काही काळापूर्वी कारवाई केलेल्या समाजकंटकांनी विद्यापीठ आणि धारुरकरांच्या बदनामीसाठी अशाप्रकारचे कारस्थान केल्याचे पत्रक काढून सांगितलं.