Todays Headline 5th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं चिपको आंदोलन
वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा 2 किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी 400 झाडे काढण्यात येणार आहेत. याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड 'चिपको' आंदोलन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता याच ठिकाणी भाजपा आमदार गणेश नाईक या झाडांच्या संरक्षणाबरोबरच नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत जनजागृती लाँगमार्च काढणार आहेत.
राज्यसभेसाठी राजकीय पक्षांचं हॉटेल मॅनेजमेंट
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेनं येत्या 6 जून रोजी संध्याकाळी शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि समर्थक लहान पक्ष तसेच आमदारांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली आहे. त्याच बरोबर येत्या 8 ते 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी ट्रायडंट हाँटेलमध्ये राहण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनेही ट्रायडंट हाँटेलमध्येच त्यांच्या आमदारांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे, कोणताही धोका किंवा गोंधळ टाळण्यासाठी आता शिवसेनेनंही हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या सलग तीन चिंतन शिबीरांमधून काय साध्य होणार?
उदयपूर, शिर्डी आणि त्यानंतर आता पनवेल अशा तीन ठिकाणी काँग्रेसचे चिंतन शिबीर होतंय. महाविकास आघाडीत अस्वस्थ असलेली कॉंग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरही अस्वस्थच आहे. वॉर्ड आरक्षणामुळे 21 नगरसेवकांचे वॉर्ड खालसा झालेत. अल्पसंख्यांक नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण प्रक्रियेत ठरवून अडचणीत आणले गेले असा कॉंग्रेसचा आरोप आहे.
पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदी ‘मिट्टी बचाओ’ अभियानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅली
पर्यावरण दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावणार
तिरुअनंतपुरम येथे पर्यावरण दिनानिमित्त विमानतळावर प्रवाशांच्या सामानाला ग्रीन टॅग लावण्यात येणार आहे. या टॅगमध्ये भाजांच्या बिया, जडी- बुटी आणि फुलं दिली जाणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधे आयोजित दोन दिवसीय साखर परिषदेचा दुसरा दिवस. यात जयंत पाटील 9:30 वाजता, वळसे पाटील दोन वाजता सहभागी होणार आहे. तर दुपारी 3 ते 5 या कालावधीत राज्य स्तरीय पुरस्कारांचे शरद पवार यांच्या हस्ते वितरण होणार आहे- मिकी
योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रृजभूषण सिंग यांनी 51 क्विंटलचा लाडू तयार केला आहे.
ओडिसाच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा काल राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे
5 जून : जागतिक पर्यावरण दिन