(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज बहुमत चाचणी, शिंदे सरकारसाठी कसोटीचा दिवस
आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. आवाजी मतदानानं बहुमत चाचणी होणार आहे.
नेमका कुणाचा व्हिप लागू होणार?
विधानसभा अध्यक्षपदासाठी व्हिप विरोधात मतदान केल्याने 39 आमदारांच्या विरोधात शिवसेनेनं अध्यक्षांकडे निलंबनाची मागणी केली आहे. शिंदे गटानेही 16 आमदारांना व्हिपच्या विरोधात मतदान केल्यानं पत्र दिलं आहे. त्यामुळे आता ही लढाई न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेला धक्का, गटनेतेपदी एकनाथ शिंदे कायम
विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर आज शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेते असतील असं पत्र विधिमंडळ सचिवालयानं दिलं असून शिवसेनेच्या भरत गोगावले यांची निवड रद्द करण्यात आली आहे. तसेच सुनिल प्रभू यांना शिवसेनेने प्रतोदपदी नियुक्ती केली होती, तीदेखील रद्द करण्यात आली. त्या ठिकाणी शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला हा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.
आज खातेवाटपाबाबत शिंदे- भाजपाची बैठक
भाजपाची शिंदे गटासोबत मंत्रीमंडळ वाटपाबाबत बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल. भाजपच्या कोअर कमिटीसोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवारांचं नाव निश्चित?
काल रात्री विरोधी पक्षनेतेपदाच्या नावासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे. आज विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांचं नाव जाहीर होईल अशी शक्यता आहे.
बंडखोरीनंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक
आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची दुपारी 12 वाजता सेना भवनमध्ये बैठक होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील विभागवार पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर होणार आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर या बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना समन्स
किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या दाम्पत्याचा सहभाग शौचालय घोटाळ्यात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांना सकाळी 11 वाजता शिवडी कोर्टात हजर राहायचं आहे.
अमरावतीत कोल्हे हत्या प्रकरणाविरोधात निषेध मोर्चा
व्यावसायिक कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्त आज सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने जमाव जमणार असल्याचं अयोजकांच्या वतीने सांगण्यात येतंय. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करत हा जमाव शांततेत घोषणाबाजी न करता त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यावेळी भाजप, विहिंप, बजरंग दल, व्यापारी आणि अमरावतीकर नागरिक असतील. हत्येतील मुख्य आरोपी इरफान शेख याला वगळून सगळ्या 6 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या 6 आरोपींना आज अमरावती न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
वारी अपडेट
आज संत ज्ञानेश्वरांची पालखी बरडहून निघेल आणि नातेपुतेला मुक्कामी थांबेल. तर संत तुकारामांची पालखी इंदापूरहून निघून सराटीला थांबेल.
ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक अल्लूरी राजूच्या 30 फूट उंच प्रतिमेचं अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर, मोदी गुजरातला जातील. गांधीनगरमध्ये मोदी पीएम डिजिटल वीक 2022 चं उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी 4.30 वाजता आहे.