Todays Headline 31st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
Top News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी, आज अखेर ओबीसी आरक्षणाशिवायच 14 महापालिकांची आरक्षण सोडत
आज राज्यातल्या 14 महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती या महापालिकांचा समावेश आहे.
हनुमान जन्मस्थान वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये प्राथमिक शास्त्रार्थ सभेचे आयोजन
हनुमानाचं जन्मस्थान नाशकातलं अंजनेरी नव्हे तर किष्किंधा असल्याचा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केलाय. त्यामुळे, वाद सुरु झालाय. हा वाद सोडवण्यासाठी नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय. देशभरातील विविध धर्म पिठाचे 25 ते 30 प्रतिनिधी आणि पिठाधिश्वर या सभेला उपस्थित राहणार आहेत. मठाधिपती गोविंदानंदांचा हा दावा उद्या खोडला जाणार का याकडे हनुमान भक्तांचे लक्ष लागलंय, सकाळी 11 वाजता सभेला सुरवात होणार आहे.
ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून केंद्र सरकारचा निषेध
केंद्र सरकारनं इंधन दरावरील करकपात केल्यानंतर इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, त्यामुळे डीलर कमिशन वाढवून देण्याची पेट्रोल पंपधारकांची मागणी केली जात आहे. मात्र, पेट्रोल पंप सुस्थितीत सुरु राहणार, पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे. पेट्रोल पंप बंद राहण्याच्या अफवेमुळे सोलापुरातील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती.
अविनाश भोसलेंच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण, आज निर्णय येणार
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं काल आपला निकाल राखून ठेवला. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे आज निर्णय देणार आहेत.
मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत गरीब कल्याण संमेलनाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भाजपच्या वतीनं 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत 'गरीब कल्याण' संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. संमेलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वाणिज्य व व्यापार मंत्री पियुष गोयल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील मार्गदर्शन करणार आहेत
राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस
राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. 3 जून पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. राज्यसभेसाठी 10 जूनला होणार आहे
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
हा दिवस 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरविण्यात आला.
आज इतिहासात
1990 : नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर
1725 : महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म.
1994 : बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबला वादक पंडित समता प्रसाद यांचे निधन