Todays Headline 25rd June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
16 बंडखोरांना अपात्रतेची नोटीस, सोमवारपर्यंत वेळ
बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशा आशयाची मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. त्यावर आता 16 आमदारांना 48 तासांच्या आत त्यांचं मत माडण्यासाठी सागण्यात आलं असून त्यांनी मत मांडलं नाही तर त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे बंडखोरांना आता शिवसेनेचं कवच सोडावं लागणार आहे. उद्यापासून सर्वांना नोटिसा जातील आणि त्यांना सोमवार पर्यंत वेळ देण्यात येईल, यावर त्यांना उत्तर द्यायचं आहे असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.
या बंडखोर आमदारांना परत पक्षात घ्यायचं का नाही ते आता उद्धव ठाकरे ठरवतील असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. या आमदारांचा एक वेगळा गट होऊ शकत नाही, त्यांना भाजपमध्ये विलिनीकरण करावं लागेल. मग ते कट्टर शिवसैनिक आहेत ही जी काही डॉयलॉगबाजी ते करत होते ती बंद होईल असंही अरविंद सावंत म्हणाले.
शिवसेनेच्या कार्यकारिणीची आज बैठक
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडावर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान दिलं आहे. आज दुपारी एक वाजता त्यांनी शिवसेना कार्य़कारिणीची बैठक बोलावली आहे.
शिवसैनिक रस्त्यावर येण्याची शक्यता, महाराष्ट्रात हाय अलर्ट
मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र राज्यातीलही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे विशेष आदेश दिले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात, असा अलर्ट त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राहुल गांधींच्या वायनाडमधील कार्यालयाची तोडफोड
शुक्रवारी केरळमधील वायनाडमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. भारतीय युवक काँग्रेसने एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की एसएफआयचे झेंडे धरलेल्या काही गुंडांनी राहुल गांधींच्या वायनाड कार्यालयाच्या भिंतीवर चढून कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.