बुलडाण्यात दहावीच्या परीक्षेच्या तणावातून दोन विद्यार्थिंनीची आत्महत्या, एकीची प्रकृती गंभीर
उंदीर मारण्याचं औषध घेतलेल्या या तिन्ही मुली खामगाव येथील अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत. तिघींपैकी निकिता रोहनकार आणि नयना शिंदें या दोन विद्यार्थीनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुपाली उनोनेवर उपचार सुरु आहेत.
बुलडाणा : दहावीच्या परीक्षेच्या तणावातून तीन शाळकरी मुलींनी उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. बुलडाणाच्या खामगावमधील ही घटना आहे.
उंदीर मारण्याचं औषध खाल्लेल्या तिन्ही मुली खामगाव येथील अरजण खिमजी नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत. निकिता रोहनकार आणि नयना शिंदें या विद्यार्थीनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर रुपाली उनोनेवर उपचार सुरु आहेत.
तीनही मुली दहावीच्या वर्गात शिकत होत्या. शुक्रवारी सकाळी या तीन मुलींनी दहावीचे प्रात्यक्षिक दिले होते. मात्र परीक्षा कठीण गेल्याने आपण दहावीच्या परीक्षेत नापास होणार अशी भीती तीनही मुलींना वाटत होती. या भीतीमुळे या मुलींनी हे टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निकिता रोहनकार या मुलीने उंदीर मारण्याची पावडर आणली.
निकिताने आणलेलं औषध तीनही मुलींनी खाल्ल, मात्र त्रास होऊ लागल्यानं तिन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान दोन मुलींचा मृत्यू झाला. तर रुपाली उनोनेवर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरु आहेत.