जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास; पुलावाचून मंत्र्यांच्याच मतदारसंघात दयनीय अवस्था
Yavatmal News Update : साजेगाव येथे गाव आणि शेतीच्या मधोमध अडाण नावाची नदी आहे. परंतु, या नदीवर पूल नाही. त्यामुळे गावकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून फरफट सुरू आहे.
Yavatmal News Update : मंत्री संजय राठोड (anjay Rathod ) यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह (Students) शेतकऱ्यांना (farmers) जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागत असल्याचं समोर आलंय. यमतमाळमधील (Yavatmal News Update) दारव्हा-दिग्रसचे विद्यमान आमदार असलेल्या संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साजेगाव येथे ही भीषण परिस्थिती आहे.
साजेगाव येथे गाव आणि शेतीच्या मधोमध अडाण नावाची नदी आहे. परंतु, या नदीवर पूल नाही. त्यामुळे गावकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून फरफट सुरू आहे. संजय राठोड हे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. शिवाय ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांच्याच दारव्हा-दिग्रस मतदारसंघातील हाकेच्या अंतरावर असलेल्या साजेगाव येथे ही भयानक परिस्थिती आहे.
साजेगावातील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत धरून नदीतून प्रवास करावा लागतोय. अडाण नदीच्या तीरावर दोन हजार लोकसंख्येचे साजेगाव आहे. या गावातील नदीच्या पैलतीरावरील वाघोळ शिवारात नदीच्या पाण्यामुळे शेतात जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. नदीवर पूल नसल्याने शेती कसण्यासाठी बोरी मार्गे किमान 25 किलोमीटरचा फेरा मारून साहित्य घेऊन जावे लागतं. या वैतागामुळे काही वर्षांपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी वाघोळ गावाजवळ आश्रय घेतलाय. त्या ठिकाणी वसाहत तयार झाली. नंतर गाव सोडण्याची समस्या सुटली. मात्र, इतर शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. जे शेतीसाठी स्थलांतरित झाले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे , अशी माहिती गावातील नागरिकांनी दिलीय.
वाघोळ गावात शाळा नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना साजेगावच्या शाळेत जावे लागते. मात्र, पूल नसल्याने त्यांच्या समोर मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पर्याय नसल्याने काही पालकांनी उपाय शोधत कंबरभर पाण्यातून मुलांना कधी खांद्यावर बसून तर कधी होडीतून शाळेत पाठवतात. या गंभीर विषयाकडे राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड लक्ष देतील का असा सवाल साजेगाव येथील शेतकऱ्यांसह विद्यार्थी वर्गातून विचारला जातोय.
दरम्यान, मंत्री आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदार संघात अशी अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. शिवाय या नदीवर लकरात लवकर पूल बांधून देण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या