राज्यात सध्या सुरु असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी : बाळासाहेब थोरात
व्यक्ती द्वेष आणि व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही, त्यामुळे ही राजकीय धुळवड योग्य नाही, असं राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.
शिर्डी : धुळवड 365 पैकी 2 दिवसांची असते, त्यानंतर ती नसली पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. व्यक्ती द्वेष आणि व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही, त्यामुळे ही राजकीय धुळवड योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. संगमनेरमध्ये एबीपी माझाशी बोलताना यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर संवाद साधला.
पुन्हा येणार म्हटलं की येत नाही, देवेंद्र फडणवीसांना टोला
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. "विधानसभा निवडणुकीत ते म्हणत होते मी पुन्हा येणार. ते पुन्हा येणार म्हटले की ते पुन्हा येत नाही हा अनुभव, असं फडणवीस म्हणाले. तसंच 2024 मध्ये सुद्धा आम्हीच सत्तेत राहू असा विश्वासही व्यक्त केला.
'शरद पवार यांचं वक्तव्य योग्य'
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम केलं पाहिजे हे शरद पवारांचे वक्तव्य योग्य असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या युवा आमदारांच्या बैठकीत केलं होतं.
'विधानसभेला अध्यक्ष मिळाला तर भाजपचा काय तोटा होणार?'
विधानसभा अध्यक्ष पदावरुन राजकारण सुरु असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. "एका विधानसभेला वर्षभरापासून अध्यक्ष नाही आणि तो होऊ नये म्हणून भाजप न्यायालयात जात आहे. विधानसभेला अध्यक्ष मिळाल्याने यांचा कोणता तोटा होणार आहे?" असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
... तर राजू शेट्टींची नाराजी दूर करण्यास तयार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. याविषयी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, "राजू शेट्टी यांची काही नाराजी असेल तर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. शेट्टी यांनी त्यांचं म्हणणं मांडलं तर जे शक्य आहे ते महाविकास आघाडी नक्की करेल."