वारांगनेचं धाडस; देह विक्रीसाठी 'नो एन्ट्री', मुलाला शिकवून सन्मानानं जगण्याचा निर्धार
वारांगनेनं धाडस करत देह विक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्धार केला आहे. तसेच तिनं घराबाहेर ग्राहकांनी येऊ नये अशा आशयाचा एक बोर्डही लावला आहे. वारांगनेच्या या धाडसाचं कौतुक केलं जात आहे.

जळगाव : कोणतीही महिला देह विक्रीच्या व्यवसायात स्वतःहुन जात नाही तर परिस्थितीमुळे त्यांना त्या व्यवसायाकडे वळावं लागतं. या ठिकाणी जाणं सोपं असलं तरी यातून बाहेर पडणं सोपं नसतं. मात्र जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील एका वारांगनेनं हे धाडस करुन दाखवलं आहे. तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या देह विक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचं स्वागत पोलिसांसह सर्व सामान्य जनतेतून होताना दिसून येत आहे.
जळगावच्या अमळनेर शहरातील गांधली पुरा भागातील बॉम्बे गल्ली परिसर हा वेश्या व्यवसायासाठी कूप्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय असल्यानं राज्य भरातून आंबट शौकीन ग्राहक या ठिकाणी येत असतात. याच वस्तीमध्ये देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेनं आपल्या देह विक्रीच्या व्यावसातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या मुलाला आणि मुलीला संगणक दुरुस्तीचे शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. मुलाच्या संगणक दुरुस्ती व्यवसायातून या महिलेच्या कुटुंबाचा चरितार्थ आता चांगल्याप्रकारे भागला जात असल्यानं. सदर महिला आणि तिच्या कुटुंबानं आपल्या परिवाराला या देह विक्रीच्या व्यवसायाच्या नरक यातनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून यापुढे सन्मानानं जगण्याचा निर्धार केला आहे.
या व्यवसायात असताना आपल्याला अतिशय लाजिरवाण्या अनुभवातून जावं लागत असलं तरी तो आपला नाईलाज होता, मात्र आपण शिकलो नसलो तरी आपल्या मुलांनी शिक्षण घावं आणि पुढं जावं अशी आपली इच्छा होती. त्यामुळे हा व्यवसाय करीत असताना ही मुलांच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्नशील राहिलो. मुलाला उच्चशिक्षित करू शकलो नसलो, तरी त्याला संगणक दुरुस्ती शिकवली आणि त्यातून तो आज चांगल्या प्रकारे रोजगार मिळवित असल्यानं आम्हाला आता या व्यवसायात राहण्याची आवश्यकता राहिली नाही, मात्र सरकारनं आणि समाजानं आमच्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी आणि विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळून दिला तर पुन्हा आम्ही कधीही या व्यावसायाकडे वळणार नाही, अशी भूमिका या महिलेने मांडली आहे.
आपली आई आपल्या लहानपणापासून या व्यवसायात असल्याचं पाहत आलोय, या व्यवसायात असल्याचं नेहमीच दुःख होत. मात्र परिस्थितीमुळे खरंतर नाईलाज होता, मात्र आईनं आपल्या मेहनतीतूनही मला आणि माझ्या बहिणीला लहानच मोठं केले. शिक्षण दिलं म्हणून आज मी स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो असल्यानं या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही कुटुंबियांनी घेतला आहे. लहान पणापासून या व्यवसायात असताना नेहमी पोलिसांच्या कारवाया, ग्राहकांचे वाईट अनुभव आम्ही अनुभवले आहेत. आता मात्र यातून पूर्णपणे बाहेर पडायचं आहे. यासाठी दारावर बोर्ड सुद्धा लावला आहे. ग्राहकांनी येऊ नये अशी सूचना त्यावर लिहिली आहे. तरीही कोणी येण्याचा प्रयत्न केला तर त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याचं सूचित केलं आहे.
पोलिसांनी आम्हाला या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी आवाहन केलं होतं, समुपदेशन केलं होतं. आम्हालाही ते पटलं असल्यानं स्वखुशीनं आम्ही या देह विक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडलो आहोत. समाजानं ही आता आम्हाला स्वीकारलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. अशी अपेक्षा या तरुणाने व्यक्त केली आहे. पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि केलेल्या सत्कारामुळे आम्ही आज सन्मानानं जगत आहोत. त्यामुळे त्यानं पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
देह विक्रीच्या व्यवसायातून पुर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या या वारांगनेचे स्वागत करताना पोलिसांनी म्हटलं आहे की, "या कुटुंबाचा हा धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयासाठी आम्ही त्यांचं त्यांच्या घरी जाऊन स्वागत करतोय. देह विक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहोत. कधी कायद्याच्या कारवाया करून तर कधी समुपदेशन करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यात म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. आता मात्र त्याला यश मिळत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे. या कुटुंबाच्या निर्णयामुळं अनेक कुटुंब आता अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त्त होऊ लागली आहेत. येत्या काही दिवसांत अनेक कुटुंब या पद्धतीनं या देहविक्री व्यसायातून बाहेर पडतील असा विश्वास व्यक्त केला आहे."























