भाजपने निर्माण केलेला संभ्रम शाहू महाराजांनी दूर केला ! शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीने संजय राऊतांनी मानले आभार
राज्यसभा उमेदवारीबाबत राज्यात भाजपसह काही लोकांकडून संभ्रम निर्माण करण्यात येत होता. जो आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेमुळे दूर झाला असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूर : भाजप आणि इतर काही लोकांकडून राज्यात राज्यसभा उमेदवारीबाबत जो संभ्रम निर्माण केला होता तो श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या भूमिकेने दूर झाला आहे. त्याबद्दल मी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराजांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्याने सुद्धा सत्याची कास सोडली नसल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. शिवसेनेने कोणाचीही फसवणूक किंवा कोंडी केलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांबाबतचा खोटेपणा आज उघड झाल्याचे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते शाहू महाराज ?
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांवर शब्द फिरवण्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शाहू महाराज म्हणाले की, "छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनिमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं.
दरम्यान, शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांना खडसावल्यानंतर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. राजेंना शिवसेनेत प्रवेश करायला लावणे ही शरद पवारांची खेळी होती, असा दावा दरेकर यांनी केला. ते म्हणाले की, संभाजीराजे भाजपकडे आले असते, तर त्यांच्या उमेदवारीचा विचारही केला असता. त्यांना शिवसेनेत यायला लावणे ही शरद पवारांची खेळी होती.
संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली असली, तरी या सुरू असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. शाहू महाराज यांच्या प्रतिक्रियेनंतर संभाजीराजे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुन सांगतो, पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते सत्यच होतं असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. आपल्या वडिलांचा आदर करत असून ते काही बोलले त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 28, 2022
माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.
हे ही वाचलं का ?
- शाहू महाराजांच्या खड्या बोलानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया
- मी शिवरायांचा वंशज नाही, पण सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? आता चंद्रकांत पाटलांकडून राऊतांवर पलटवार