व्यसनामध्ये बुडालेल्या बापाने पोटच्या गोळ्याला विकले तृतीयपंथीला ; कोल्हापुरातील घटना
चांदी कारागीर म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे कोल्हापुरात काम केलं. मात्र लॉकडाऊनमध्ये हातचं काम केलं आणि आजारी असलेल्या पत्नीचा उपचार कसा करायचा हा प्रश्न सतावू लागला.
कोल्हापूर : कोरोनामुळे हाताला काम नाही, पत्नीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, व्यसनामध्ये आयुष्य बुडालेल्या बापाने पोटच्या गोळ्याला तृतीयपंथीला पाच लाखाला विकल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.
मूळचा पन्हाळा तालुक्यातील काटेभोगावचा असलेला वडील कामानिमित्त कोल्हापूरच्या गंगावेश परिसरात राहतो. चांदी कारागीर म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे कोल्हापुरात काम केलं. मात्र लॉकडाऊनमध्ये हातचं काम केलं आणि आजारी असलेल्या पत्नीचा उपचार कसा करायचा हा प्रश्न सतावू लागला. काही दिवसात त्याने पत्नी आणि लहान मुलाला माहेरी पाठवलं. आणि त्यानंतर मोठा मुलगा त्याने तृतीयपंथी यांच्या स्वाधीन केलं.
साधारण मे महिन्यात नोटीसीद्वारे संबधित तृतीयपंथीने मुलाला आपल्याकडे ठेवलं, ही बाब चिमुकल्याच्या आजोबांना समजली. त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चिमुकल्याला परत आणण्यासाठी तृतीयपंथी यांच्याकडे गेले. मात्र त्यावेळी त्यांनी पाच लाख द्या आणि मुलाला घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर संबंधित आजोबांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलिसांकडे धाव घेतली. कोल्हापूर शहराच्या उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि चिमुकल्याचा ताबा घेऊन त्याला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले.
मुलाच्या कस्डीचा निर्णय न्यायालयात होईल
संबंधित प्रकरणातील मुलाला सध्या चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलाची आई त्याला संभाळण्यास सक्षम नाही, वडील सक्षम नाहीत अशावेळी न्यायालय योग्य तो निर्णय देईल. अजून याबाबत फिर्याद देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर देखील अडचणी आहेत.