ठाण्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची आत्महत्या, नागपूरच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
नागपुरातील तीन पोलिस अधिकाऱ्यांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागपूर : नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नागपूरात मिळालेल्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील मोरीवली पाडा येथील अष्टविनायक इव्हेन्यू या इमारतीत राहणाऱ्या सचिन साबळे यांनी 18 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती..
नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशन मध्ये एका व्यक्तीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या नावाखाली नागपूरच्या या अधिकाऱ्यांनी सचिन साबळे यांना त्रास देणे सुरु केले होते. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले होते.
सचिन साबळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सर्व प्रकार एका इमेल मध्ये लिहून ते इमेल स्वतःला पाठवले होते. चौकशीत हा मेल पोलिसांना मिळाला आणि हे प्रकरण समोर आले.
सचिन साबळे यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नागपूरच्या या 3 अधिकाऱ्यांसह नीता खेडकर नावाची एक महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ठाणे पोलिसांनी उपनिरीक्षक दीपक चव्हाण यास अटक केली आहे. नागपुरात ही माहिती मिळताच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस उपनिरिक्षक दीपक चव्हाण यांना निलंबित केले आहे. तर इतर दोन अधिकाऱ्यांची ठाणे पोलीस चौकशी करणार आहे.