Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Adani Group: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित आहे.
Congress On Adani Group: राज्य सरकार अदानींकडून वीज खरेदी करणार आहे. अदानी समूहानं महाराष्ट्राला 6,600 मेगावॅट नूतनीकरणक्षम आणि औष्णिक वीज पुरवण्याचं कंत्राट जिंकलं आहे. अदानी समूह प्रति युनिट 4.08 रुपयांच्या बोलीनं जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवर सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. टेंडर मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित आहे.
यानंतर काँग्रेस पक्षात अचानक नाराजी पसरली आहे. या करारात महायुती सरकारनं हेराफेरी केल्याचा दावा केला आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होण्याआधी शेवटच्या क्षणी फायदा मिळवण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्न आहे, असंदेखील म्हटलं आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, "महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार दारुण पराभवाकडे वाटचाल करत असतानाही त्यांनी त्यांच्या सत्तेतील शेवटच्या काही दिवसांत हेच करायचं ठरवलं आहे."
अदानी पॉवर त्यांच्या नव्या 1,600 मेगावॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल क्षमतेमधून 1,496 मेगावॅट (शुद्ध) औष्णिक वीज पुरवेल. याव्यतिरिक्त, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेल्या खवडा अक्षय ऊर्जा उद्यानातून 5 गिगावॅट (5,000 मेगावॅट) सौर उर्जेचे योगदान देईल. अदानी ग्रीन एनर्जी कराराच्या संपूर्ण कालावधीसाठी 2.70 रुपये प्रति युनिट दरानं सौर उर्जा पुरवेल. दरम्यान, कोळशाच्या किमतीवरून औष्णिक वीजेची किंमत ठरवली जाईल.