(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'शिक्षकांनी सायकलवर शाळेत यावे!', पर्यावरण रक्षणासाठी यवतमाळ झेडपीचा ठराव
Yavatmal ZP School Updates : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेत सायकल घेऊन जावे, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेत सायकल घेऊन जावे, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीने घेतला आहे . पर्यावरणाचे महत्त्व राखले जावे, पेट्रोलची बचत व्हावी तसेच मोटारसायकलमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे आणि शिक्षकांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी आता जिल्हा परिषदच्या शाळेच्या शिक्षकांनी शाळेत जातांना सायकल घेऊन शाळेत जावे असा ठराव जिल्हा परिषदच्या शिक्षण समितीने घेतला आहे.
ग्रामीण भागात शिक्षकांचे अनुकरण अनेक व्यक्ती करतात. त्यामुळे त्यांना पाहून अनेक व्यक्ती बोध घेतील, शिक्षकांच्या सायकल घेऊन शाळेला जाण्याच्या कार्याचे अनुकरण करतील आणि हा निर्णय सर्वांसाठी चांगला आहे. यामुळे शिक्षकांचेही आरोग्य सदृढ राहील, पैशाची बचत होईल असे दिग्रस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षक अमिन चौहान यांनी सांगितले.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साधारण 2200 शाळा आणि त्यात 9000 शिक्षक आहेत. त्यामुळे हा निर्णय हा ठराव शिक्षकांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे, असे शिक्षण सभापती श्रीधर मोहोड यांनी सांगितले आहे.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनी घरापासून शाळा जवळ असल्यास त्यांनी सायकल घेऊन शाळेत जावे असा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.
पुढील काळात याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण अधिकारी हे पत्र काढणार आहे, असे शिक्षण सभापती यांनी सांगितले आहे. सायकल घेऊन शाळेत जावे हा निर्णय शिक्षकांसाठी ऐच्छिक असला तरी हा निर्णय उत्तम आणि फायदेशीर आहे, असेही महिला शिक्षकांनी म्हटलं आहे
यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पुढील काळात सायकल घेऊन शाळेत दाखल होतील आणि त्याचा विद्यार्थ्यांना सुध्दा बोध मिळेल अशी अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या
Solapur ZP च्या सर्व 14000 कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका डिजीटलाईज, सर्व्हिस बुक मोबाईलवर पाहता येणार