(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare: देवेंद्र फडणवीस चाणक्य नसून त्यांनी माणसं संपवली: सुषमा अंधारे
भाजपाचे आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा. केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावे. भाजपाने विविध जातींना आपापसात झुंजवू नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
भिवंडी : महाप्रबोधन यात्रेत (MahaPrabodhan Yatra) कपिल पाटील (Kapil Patil) यांचा स्पेशल एपिसोड बनवणार आहे. त्यामुळे इलाका तुमचा आणि धमाका आमचा राहील. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चाणक्य नसून जुगाडू आहेत. त्यांनी माणसं घडवली नाही तर त्यांनी पक्षातील माणसं संपवली आहेत असा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आरोप केला आहे. भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. रविवारी सायंकाळी भिवंडी ग्रामीणमध्ये उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.या वेळी सुषमा अंधारे यांनी भाजपासह शिवसेना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. तसेच खासदार कपिल पाटील यांचा समाचार घेतला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल पाहून वाईट नाही वाटले. महाविकास आघाडीतील काँग्रेसने चांगली लढत दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये निवडणुकीच्या काळात लाडली बहण योजना जाहीर केली. आचारसंहिता सुरू असताना पैसे वाटले हा आचारसंहितेचा भंग आहे पण त्याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष सोयीस्कर केले. भाजपने महाराष्ट्रात जाणीवपूर्वक बी आर एस ला खतपाणी घातलं,त्याला काँग्रेसने रोखले
भाजपाने विविध जातींना आपापसात झुंजवू नये : अंधारे
मराठा आरक्षणावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा मराठा आणि ओबीसी समाजाला आपापसात झुंजवत कलगीतुरा करत आहे. एका नेत्याने छत्रपती यांची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण देणार असे सांगायचं तर एकाने ओबीसींच्या सोबत आहे असे सांगायचे नक्की तुम्ही कोणाच्या सोबत आहात हे कळत नाही.आरक्षणासाठी कायदा करण्याचे अधिकार राज्याकडून केंद्राकडे गेले आहेत. भाजपाचे आरक्षण देण्याची खरी नियत असेल तर त्यांनी विधानसभेत कायदा करून केंद्राकडे पाठवावा. केंद्राने विशेष अधिवेशन घ्यावे. भाजपाने विविध जातींना आपापसात झुंजवू नये.
शेतीसाठी चुकीचे आयात धोरण : अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, एकीकडे दुष्काळ व त्यानंतर अवकाळी यामुळे शेतकरी त्रस्त असताना सरकारला त्याकडे बघण्यासाठी वेळ नाही. तृणधान्य वर्ष साजरे करताना ज्वारीचा समावेश तृणधान्य गटात येतो. परंतु नुकसानीची शासकीय पोर्टलवर माहिती भरताना त्यामध्ये ज्वारीचा रकाना नाही. सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे आहे. पीक विम्याची जाहिरात केली जाते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही शेतीसाठी चुकीचे आयात धोरण यामुळे शेतकरी त्रस्त आहे.