Supriya sule Pune: गलिच्छ राजकारणासाठी महिलांचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या
महिलांचा वापर हा स्वतःच्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे,असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
Supriya sule Pune : महिलांचा वापर हा स्वतःच्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केलं आहे. त्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. चांगली संधी मिळाली तर माय-बाप जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवू शकेल, यासाठी मी राजकारणात आले, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
राजकारण करत असताना आपण जी भाषा वापरतो ती खरोखरच सुसंस्कृत आहे का?प्रत्येक महिला, प्रत्येक कृतीवर आपण बोललेच पाहिजे असे नाही. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली म्हणाले होते, ज्या दिवशी मीडिया ह्या गोष्टी दाखवणे बंद करेल त्या दिवशी हे थांबेल. मात्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. रोज पेपर वाचा, बातम्या बघा हे कोणत्या तोंडाने मुलांना सांगायचं, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
एखाद्या महिला किंवा पुरुषावर आरोप झाला की महिलेला मत विचारलं जातं. कोणत्याही महिलेबद्दल ज्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. नावं ठेवली जातात. त्यावेळी ती कोणाची तरी आई, बाहीण, पत्नी,मुलगी आहे, याचा आपण विचार करायला हवा. हे सगळं महिलांबाबतच राजकारण सत्ताधारी पक्षाकडून केलं जात आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कधीही पडणार नसल्याचंही त्या म्हणाल्या.
"तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील"
उर्फीजावेदचं प्रकरण जेव्हा मी टीव्हीवर बघते तेव्हा मला कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुम्ही दाखवणं बंद करा, लोकं बोलणं बंद करतील, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना विनम्र आवाहन आहे की आपल्या गलिच्छ राजकारणासाठी, कोणत्याही विषयासाठी महिलेविषयी कोणी ही बोलू नये. महाराष्ट्राची परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते. त्यामुळं या सर्वांचा विचार करून स्वतःला आवरलं पाहिजे. मुळात मला जनतेनं निवडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेलं आहे. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं, असंही त्या म्हणाल्या.
प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडतं का?
ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडतं का? रोज टीव्ही वर कशाला यायला हवं. मुख्य मागणीला बगल द्यायचं काम सध्या ईडी सरकार करते आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.