(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपला 18 खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान करणं दुर्दैवी : सुप्रिया सुळे
Supriya Sule Press Conferace : मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.
Supriya Sule Press Conferace : महाराष्ट्राची लेक म्हणून आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे. तसेच मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.
"दीड तासांचं पंतप्रधानांचं भाषण झालं. खूप अपेक्षेनं मी त्या भाषणाकडे पाहत होते. कारण खूप अडचणीच्या काळातून आपला देश चालला आहे. महामारीतून संपूर्ण जग हळूहळू बाहेर पडतंय. त्यामुळे माननिय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैव की, आपल्या महाराष्ट्राबाबत पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी. मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट. ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण 18 खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ते भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.", असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मोदी भाजपचे नाही देशाचे पंतप्रधान : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, "एका पक्षाच्यावतीनं पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झालं. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचं नाही. मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत."
पाहा व्हिडीओ : मोदींना पंतप्रधानपदी बसवणाऱ्या महाराष्ट्रातील मतदारांचाही अपमान : सुप्रिया सुळे
काय म्हणाले होते पंतप्रधान?
कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या काळात देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेसनं केलं. काँग्रेसनं यूपी-बिहारींना मुंबईतून बाहेर जाण्यासाठी उकसवलं. लॉकडाऊनमध्ये मजुरांना रेल्वेची मोफत तिकिटे काढून दिली. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM Modi : पंतप्रधान मोदी यांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा