उद्धव ठाकरेंचा पीक विमा मोर्चा होणार नाही, सहकार मंत्री सुभाष देशमुखांना विश्वास
ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही, ती दिली जाईल. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.
सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पीक विमा मोर्चा होणार नाही, असा ठाम विश्वास सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुभाष देशमुख आज सांगलीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी पीक विमा बाबत होणारी फसवणूक प्रकरणी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यावर बोलताना सुभाष देशमुख यांनी म्हटलं की, राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यावर पीक विम्या बाबत अन्याय होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही, ती दिली जाईल. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
त्यामुळे पीक विमाबाबत कोणतंही आंदोलन राज्यात होणार नसल्याचा विश्वास सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरे हे देखील पीक विमा विरोधातील मोर्चा मागे घेतील असं त्यांनी म्हटलं.
पीक विमा कंपन्यांवर 17 जुलैला शिवसेनेचा 'इशारा मोर्चा'
शेतकऱ्यांसाठी मुंबईतील पीक विमा कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. येत्या बुधवारी म्हणजे 17 जुलै रोजी वांद्र्यातील पीक विमा कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शेतकरी मोर्चा नसेल, तर शेतकऱ्यांसाठी मोर्चा असेल.
शिवसेनेचा हा इशारा मोर्चा आहे. जर इशारा देऊनही झालं नाही तर आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राकडे स्वतंत्र कृषी स्थापन करण्याची मागणी केल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पंतप्रधान पीक विमा योजना' चांगली असली तरी आजही अनेकांना मदत मिळालेली नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.