(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Workers Strike : अल्टिमेटम संपला... मेस्मातंर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता
ST Workers Strike : मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शेवटचा अल्टिमेट आज संपतोय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन परब यांनी केलं होतं.
ST Workers Strike : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला शेवटचा अल्टिमेट आज संपतोय. आंदोलक कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन परब यांनी केलं होतं. एसटी कर्मचारी आज कामावर रुजू झाल्यास त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र, कामावर रुजू न झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यातंर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा परब यांनी दिला होता. संपामुळे आतापर्यंत एसटीचे जवळपास साडेपाचशे कोटींचं नुकसान झालंय. महामंडळाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटीच्या एकूण 93 हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर हजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे. राज्यातील जवळपास 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार पगार करण्यात आला. तर संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावं लागणार आहे. संपकऱ्यांवर मेस्मा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, अशी सध्याची परिस्थिती आहे.
पाहा व्हिडीओ : एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परबांनी दिलेला अल्टीमेटम आज संपतोय
काय म्हणाले होते अनिल परब?
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला होता. सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. तर जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, असंही परब म्हणाले.
अनिल परब म्हणाले की, सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतलं जाईल. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं. त्यांना ही संधी दिली जाईल. जर कुणाला अडवण्यात आलं तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले होते. सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही. 2018 च्या नियमानुसार एसटीही अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे मेस्माची कारवाई केली आणि करता येते, असंही ते म्हणाले. परब म्हणाले तरीही माणुसकीच्या दृष्टीनं विचार करुन कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचं 550 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असंही परब यांनी सांगितलं होतं
परब यांनी सांगितलं होतं की, एक महीना जे कामागार कामावर नव्हते त्यांना पगाराला मुकावं लागणार आहे. त्याला नेते जबाबदार आहेत. मात्र त्याची नुकसान नेते देणारं नाहीत, असंही ते म्हणाले. परब म्हणाले की, महाराष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांशी मी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की, कामगार यायला तयार आहेत. जवळपास 10 हजार कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे काही कर्मचारी गटागटाने आम्हाला भेटत आहेत. काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचा संबंध संपाशी जोडला जात आहे.
आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन
आतापर्यंत तब्बल 10 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तब्बल 2 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावं लागतंय, दुसरीकडे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागत आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा