ST Workers Strike : मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळानं हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यानं आता एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळानं 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे. 


एसटी संपाला दोन आठवडे झाले तरी तोडगा निघण्याची कोणतीच चिन्हं दिसत नाहीत. दिवाळीपासून राज्याची जीवनवाहिनी ठप्प आहे. तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी ठाण मांडलं आहे. सरकारनं संप मागे घेण्याचं आवाहन केलं असलं तरी कामगारांनी ते धुडकावलं आहे. त्यातच राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात हजर व्हावं असं आवाहन आंदोलक नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करून अहवाल तयार करण्याचं काम सुरु असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (शुक्रवारी) सांगितलं. पण दोन्ही बाजूंकडून चर्चेत तोडग्याची कोणतीही चिन्हं दिसत नसल्यानं संपाचा तिढा कायम आहे.


एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण पर्याय उपलब्ध : अनिल परब


गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike) अद्याप तोडगा निघालेला नाही.   संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी (Anil Parab)  एक मोठं  वक्तव्य केलं आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे अनिल परब म्हणाले..


अनिल परब म्हणाले,  सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही.  इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन  निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे.


तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळ राबवणार 'युपी पॅटर्न'?


एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन कराराप्रमाणे वेतन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आता उत्तर प्रदेश पॅटर्न राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपावर अद्यापही तोडगा निघाला नाही. संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाने खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


एसटी महामंडळाने आता उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यावर भर दिला आहे. तोट्यात असलेल्या महामंडळाला खासगीकरणावर भर देण्याचा सल्ला सल्लागार संस्थांनी दिला आहे. एसटी महामंडळाकडे दोन ते तीन सल्लागार संस्था आहे. त्यांच्यामार्फत महामंडळ वेळोवेळी सल्ला घेतला जातो.   


कोरोना काळात एसटी देखील कर्मचाऱ्यांचा पगार सुरु होता. जर करारानुसार, हा पगार द्यायचा असेल तर त्यासाठी खासगीकरणामार्फत पैसे उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. परिवहन विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात 'उत्तर प्रदेश पॅटर्न' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील परिवहन संस्थेच्या बहुसंख्याक बस गाड्या या खासगी मालकीच्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :