ST Workers Strike :  एसटी संपाचा आज बारावा दिवस आहे. एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 12 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे. काल  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. तसेच दोन हजारांहून अधिक  कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली असून 24 तासात कामावर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
दुसरीकडे एसटी कामगारांच्या आत्महत्यांचं सत्र थांबत नाहीय.  एसटीचे विलीनीकरण करा या मागणीसाठी खामगाव येथील एसटी डेपोत मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या विशाल अंबालकर या कर्मचाऱ्याने काल रात्री विष प्राशन केले होते. त्याला तात्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने तातडीने रात्री उशिरा अकोला येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारा दरम्यान विशाल अंबालकर यांचा मृत्यू झाला.  राज्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येत पुन्हा एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची भर पडली आहे.  जिल्ह्यातील एसटी कर्मचारी पुन्हा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं स्पष्ट होत आहे.  
 
एसटीतील 2 हजार 296 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस 
गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून 2296 रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या 4 हजार 349 वर गेली आहे. महामंडळाकडून 2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता त्यापाठोपाठ महामंडळात रोजंदारीने काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी 2296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.  


यांना बजावली नोटीस
चालक : २५
चालक तथा वाहक : २१०१
वाहक : १३२
सहाय्यक : २२
लिपिक टंकलेखक : १६