Nanded: अवघ्या दोन दिवसांचे प्रशिक्षण अन् यांत्रिकी कर्मचारी बनले चालक तर वाहतूक नियंत्रक बनले वाहक, नांदेडमधील प्रकार
अवघ्या दोन दिवसाच्या प्रशिक्षणानंतर महामंडळने नऊ जणांच्या हाती स्टेअरिंग दिले आहे. परंतु अप्रशिक्षित चालकांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.
नांदेड: एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही. त्यामुळे एसटी आंदोलन अजून सुरुच असून परिणामी नेहमी एसटीने प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि सामान्य नागरिकांची मोठी अडचण होऊन बसलीय. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून रुतलेली ही लालपरीची चाके पुन्हा गतिमान करण्यासाठी नांदेड आगारातील यांत्रिकी कर्मचाऱ्यांना एसटी चालक तर वाहतूक नियंत्रकांना वाहक बनण्याची वेळ आलीय.
गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनामुळे नऊ आगारातील एकही कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाला नाहीय. त्यामुळे एसटीची ही चाके पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड विभागाकडून हा खटाटोप सुरू आहे. नऊ यांत्रिकी कारागीर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चालक म्हणून काम करण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचारी संभ्रमात आहेत. तर हे शासनाचे आदेश प्रमोशन आहे की डीमोशन असा सवाल कर्मचाऱ्यांनी केलाय .
नांदेड विभागातून आता केवळ सात एसटी बसेस चालू झाल्या आहेत. परंतु नऊ आगारातील एकही वाहक अथवा चालक कामावर रुजू झाला नाहीये. त्यासाठी नांदेड आगारातील अधिकाऱ्यांच्या गाडीवर असणारे ड्रायव्हर, वाहतूक नियंत्रक, यांत्रिकी विभागाच्या कारागीरांच्या हातात स्टेअरिंग देऊन एसटी पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. त्यासाठी नांदेड विभाग नियंत्रक कार्यालयातून नऊ जणांना अवघे दोन दिवसाचे प्रशिक्षण देऊन प्रवाशी गाड्या रस्त्यावर चालविण्याची परवानगी देण्यात आलीय.
प्रामुख्याने वाहतूक नियंत्रक, यांत्रिकी कर्मचाऱ्यांना आगारात गाड्या चेकिंगची परवानगी असते. तसेच एखादे प्रवासी अवजड वाहन चालवण्यासाठी फक्त दोन दिवसाचे प्रशिक्षण पुरेसे आहे का? हाही संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे प्रवाशांचे जीव नाहक जाऊ नयेत म्हणजे कमावले.
एखादे अवजड अथवा प्रवासी वाहन चालवण्यासाठी किमान एक महिन्याचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित असल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर एसटी महामंडळमध्ये चालक म्हणून रुजू झालेल्या तरुणांना अगोदर एक वर्ष प्रवासी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊनच नंतर रस्त्यावर प्रवासी वाहने चालवण्याची मुभा दिली जाते. परंतु एसटी पूर्वपदावर यावी, लालपरी पुन्हा रस्त्यावर दिसावी ही सर्वसामान्यांची जरी इच्छा असली तरी, त्यासाठी थेट अप्रशिक्षित लोकांच्याच हातात स्टेअरिंग देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणे एसटी महामंडळने थांबवावे हे मात्र नक्की.
संबंधित बातम्या :