ST strike : एसटी महामंडळाचे परिपत्रक जारी, निलंबनाची कारवाई मागे
ST strike : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाने आज परिपत्रक जारी करुन कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई मागे घेतली आहे.
मुंबई: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई मागे घेण्याबाबत अखेर एसटी महामंडळाने परिपत्रक काढले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली निलंबनाची तसेच बदली याबाबतची कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक काढलय.
या पत्रकानुसार जे कर्मचारी रुजू होवू इच्छितात त्यांना तत्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, ज्यांची निलंबनाची कारवाई किंवा कारवाईची नोटीस देण्यात आली, ती मागे घेण्यात आली आहे.
मात्र बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ दिलासा मिळणार नाही. बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार अपील करावयाचे आहे. ज्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केलेले आहे त्यांच्याबाबत चार आठवड्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना प्रशासनाने परिपत्रकाच्या आधारे दिला आहे. मात्र संपकाळातील वेतन त्यांना मिळणार नसल्याचे यापैकी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 22 एप्रिल नंतर कामावर हजर न होणाऱ्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याचेही आदेश याद्वारे देण्यात आले आहे.
परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे खालील प्रमाणे,
1. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशाच्या अनुपालनार्थ खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. आपल्या विभाग / घटक / आगारातील संपामध्ये सहभागी असणारे जे कर्मचारी दि. 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी हजर होतील त्यांना तात्काळ रुजू करुन घेण्यात यावे.
2. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत निलंबनाची कारवाई झालेली आहे, असे कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कर्तव्यावर रुजू होतील, त्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे.
3. तसेच ज्या कर्मचाऱ्यांवर शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत रा.प. महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशा स्वरुपाची कारणे दाखवा नोटीस दिलेली असेल असे कर्मचारी दि. 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामगीरीवर रुजू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी.
4. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित न करता आरोपपत्र देऊन बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे, ते कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी कामावर रुजू झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी.
5. संपकालावधीत संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, ते कर्मचारी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पूर्वी हजर होतील त्यांच्या बदल्या रद्द करुन त्यांना बदलीपूर्वीच्या ठिकाणी हजर करुन घेण्यात यावे.
6. ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, ते दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पुर्वी हजर झाल्यास त्यांची सेवासमाप्ती तात्काळ रद्द करण्यात यावी. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये.
7. आपल्या विभाग / घटक / आगारातील संप कालावधीमध्ये ज्या कर्मचा-यांना शिस्त व आवेदन कार्यपध्दती अंतर्गत रा.प.महामंडळाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे व ज्या कर्मचाऱ्यांनी प्रथम आवेदन सादर केले आहे, त्यांचे प्रथम आवेदन या आदेशापासून 4 आठवडयांच्या आत ताकीद देऊन निकाली काढण्यात यावे व त्यांना रा.प.सेवेत सेवेच्या सलगतेसह पुनःस्थापित करण्यात यावे. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप प्रथम आवेदन सादर केले नाही त्यांना प्रथम आवेदन सादर करण्यासाठी तीन आठवडयांची मुदत असेल. प्रथम आवेदन दाखल झाल्याच्या दिनांकापासून पुढील चार आठवडयांच्या आत सादर करावे आणि प्रथम आवेदन ताकीद देऊन निकाली काढण्यात यावे व त्यांना रा.प. सेवेत सेवेच्या सलगतेसह पुनःस्थापित करण्यात यावे. मात्र त्यांना मागील कालावधीचे वेतन देण्यात येऊ नये. तसेच जे कर्मचारी वर दिलेल्या विहित मुदतीत प्रथम आवेदन सादर करणार नाहीत, त्यांना रा.प. सेवेत स्वारस्य नाही असे समजण्यात येईल व त्यांचे बडतर्फीींचे आदेश अंमलात येतील.
8. जे कर्मचारी मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दि. 22 एप्रिल रोजी पर्यंत हजर होणार नाहीत ते त्यांचेविरुध्द रा.प. महामंडळातील शिस्त व आवेदन कार्यपध्दतीनुसार कारवाईस पात्र ठरतील.
9. ज्या कर्मचाऱ्यांविरुध्द संपकालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी किंवा तत्पुर्वी हजर होण्याची इच्छुकता दर्शविल्यास त्यांना हजर करुन घेण्यात यावे.
10. जे कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचे कर्मचारी निवृत्ती वेतन अंशदान संबंधित भ.नि.नि. क्षेत्रिय कार्यालयात जमा करण्यात यावे तसेच त्यांना देय असलेले भ.नि.नि. व उपदान या आदेशापासून एका महिन्याच्या आत अदा करण्यात यावे.
11. कर्मचारीवर्ग खाते परिपत्रक क्र. 10/2020 , दि.30.04.2020 व परिपत्रक क्र. 33/2021 संचारबंदी कालावधीत प्रत्यक्ष कर्तव्य करणा-या रा.प.कर्मचारी, पर्यवेक्षक यांना प्रतिदिन प्रतिकर्तव्य रुपये 300/- विशेष प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबत सूचना प्रसारीत केलेल्या आहेत, सदर परिपत्रकीय सूचनांनुसार ज्या कर्मचा-यांना सदर भत्ता दिला गेला नाही त्यांना याआदेशापासून 8 आठवडयांच्या आत भत्त्याची रक्कम अदा करण्यात यावी.
12. कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या रा.प.अधिकारी / कर्मचारी यांच्या वारसांचे सानुग्रह सहाय्य व सहाय्य देण्याकरीता पात्र असलेले प्रलंबित अर्ज या आदेशाच्या दिनांकापासून 4 आठवडयांच्या आत निकाली काढण्यात यावेत.
उपरोक्त सुन्नमांनी तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदरचे परिपत्रक मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.