Coronavirus | एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका, एकाच दिवशी दीड कोटींचं नुकसान
एसटी महामंडळाच्या सर्व विभागात 16 मार्चला 9 हजार 262 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिवनेरीचं 1 कोटी 28 लाख 67 हजार 500 रुपयाचं उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून घेण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील परिवहन सेवेलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक फटका शिवनेरी बस सेवेला बसल्याचं चित्र आहे. हजारो फेऱ्या बंद केल्याने एसटी महामंडळाचं एकाच दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांचं उत्पन्न बुडालं आहे. एसटी महामंडळाच्या सर्व विभागात 16 मार्चला 9 हजार 262 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शिवनेरीचं 1 कोटी 28 लाख 67 हजार 500 रुपयाचं उत्पन्न बुडाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या भीतीपोटी राज्यभरातील बहुसंख्य प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. मुंबई ते पुणे ते मुंबई, ठाणे ते पुणे ते ठाणे मार्गावर वातानुकूलित शिवनेरी बस गाड्या धावतात. 11 मार्चपासून एकूण 20 हजार 657 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे महामंडळाचं 3 कोटी 17 लाख 66 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामध्ये एसटीच्या मुंबई, ठाणे, पुणे आणि औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. एसटीच्या दररोज 18 हजार फेऱ्या होतात आणि 22 कोटी रुपये महसूल मिळतो.
प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बस कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय आणि काही खासगी कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने गावाकडे जात आहेत. त्यांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली आहे. तसंच खासगी बस चालकांनी जादा भाडे आकारण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही परब यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
18 हजार बसची स्वच्छता कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांकडून एसटी महामंडळाच्या तब्बल 18 हजार बसची स्वच्छता केली जात आहे. राज्यात दररोज 18 हजार एसटी बस धावतात, त्यात 67 लाख प्रवासी यातून प्रवास करतात. एसटीमधून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एसटी बस 'डीप क्लीन वॉश' केल्या जात आहेत.
Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एसटी महामंडळाच्या तब्बल 18 हजार बसेसची स्वच्छता