(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Bus: एसटीला 'अच्छे' दिन येणार, तोट्यात असलेले एसटी महामंडळ आता नफ्याच्या उंबरठ्यावर
एसटी महामंडळाचा मासिक आणि दैनंदिन हा तोटा अगदी काही कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता आहे
मुंबई : 'गाव तेथे एसटी' असं ब्रीद कायम ठेवताना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींना एसटी महामंडळाला (ST Mahamandal) सामोरे जावे लागत होते. 1990 नंतर अनेक वर्षात एसटी समोर आर्थिक अडचणी कायम आहेत . मागील वर्षभरापासून तब्बल 9000 कोटी रुपये एसटी महामंडळ संचित तोट्यात आहे . त्यात आता हा एसटी महामंडळाचा मासिक आणि दैनंदिन हा तोटा अगदी काही कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता आहे.
एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी झाली आहे. आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती.त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 9000 कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे लाल परीचे पुढे काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र तीच एसटी आता तोट्याच्या उंबरठ्यावरून नफ्याच्या उंबरठ्यावर आहे.
वर्षभरापूर्वी एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना, दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. तत्कालीन सरकारने महिना 300 कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. मात्र एसटी महामंडळाने गेल्या वर्षभरात विविध योजना राबवून लाल परी ला आणि त्यांच्या प्रवाशांना आनंदाची बातमी दिली. हजारो कोटी रुपयात तोट्यात असलेली एसटी आता नफ्याच्या उंबरठ्यावर आहे.
लाल परीची परिस्थिती बदलली !
- गेल्या वर्षभरापूर्वी एसटी महामंडळ साधारण साडेतीन कोटी रुपयात दिवसाला तोट्यात असायचं
- मात्र आता दिवसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा फक्त लाखामध्येच आहे
- वर्षभरापूर्वी 90 ते 100 कोटी रुपये महिन्याला एसटी महामंडळाला तोटा असायचा
- मात्र आता 26 कोटी 33 लाखांवर आहे
- वर्षभरापूर्वी अंदाजे 753 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न होतं
- तर आता हे उत्पन्न अंदाजे साधारण 900 कोटी रुपयांपर्यंत आहे
- पूर्वी एसटी महामंडळाचा खर्च हा 779 कोटी रुपयांवर होता
- आता एसटी महामंडळाचा अंदाजे खर्च हा सव्वा नऊशे कोटी रुपये आहे
संपानंतर कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या पगारासाठी 350 कोटी रुपये एसटी महामंडळाला कमी पडत होते, यासाठी राज्य सरकारकडून मदत करण्यात येते. एसटी नफ्याच्या उंबरठ्यावर येत असल्याने राज्य सरकारवरील हा आर्थिक ताण कमी होणार आहे.सरकार आणि प्रशासनाने मिळून एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सवलती आणि विविध योजना वाढवल्यानंतर तूट कमी होण्यास सुरुवात झाल्याचे तज्ञ सांगतात.
कशामुळे एसटी महामंडळाला होतोय फायदा?
- 75 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवास या योजनेसाठी सरकारकडून मिळत असलेली रक्कम
- महिलांना 50 टक्के तिकीट सवलत योजनेसाठी सरकारने प्रतिपूर्तीसाठी दिलेली रक्कम
- महिलांना तिकीटात 50 टक्के सूट दिल्यानंतर एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली
- चक्क 14 लाख 75 हजार महिला दिवसाला एसटीनं प्रवास
- 65 ते 75 वय असलेल्या नागरिकांना 50 टक्के सवलत योजनेसाठी सरकारने दिलेली रक्कम यामुळे एसटी महामंडळाला फायदा होत आहे
- या विविध योजना आणि सवलती मध्येच एसटी महामंडळाचे राज्यातील 31 विभागांपैकी 18 विभाग सध्या फायद्यात आहेत.
सरकार आणि एसटी महामंडळ यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याची परिस्थिती आहे . आज घडीला एसटी महामंडळ 1990 ते आतापर्यंत एकूण 9 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात आहे. मात्र आता मासिक आणि दैनंदिन तोट्याच प्रमाण कमी झालं आहे. यामुळे पुढील काळात एसटी महामंडळ राज्य सरकारकडून पैसे घेण्याची गरज लागणार नाही आणि येणाऱ्या काही महिन्यात नक्कीच एसटी महामंडळ नफ्यात पाहायला मिळेल अस चित्र सध्या आहे.
हे ही वाचा :