पंढरपूर  :  पंढरपूरमध्ये (Pandharpur Latest Update) चांगल्या कंपनीची दुचाकी चार हजारात विकायला आला आणि दुचाकी चोरांची टोळी अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या टोळीकडून 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात यामुळे पंढरपूर पोलिसांना यश आले आहे . या साताऱ्यातील चोरांकडून 11 लाख 70 हजार रुपयांच्या 23 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील युवराज निकम या सातारा जिल्ह्यातील अट्टल आरोपीवर घरफोडी, दुचाकी चोरीसारखे 80 गुन्हे दाखल आहेत. 


भिकाजी दादा अवघडे , युवराज अकोबा निकम,  किशोर कुमार जगदाळे  अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दुचाकीचोरी संदर्भात 20 नोव्हेंबर रोजी  एक गुन्हा शहर पोलिसांत दाखल झाला होता. यादरम्यान, पंढरपुर येथील कॉलेज चौकात यातील भिकाजी अवघडे हा दुचाकी विक्रीस आला असून गिऱ्हाईकाच्या शोधात असल्याची गोपनीय माहिती मिळाली . पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. 


तपास केला असता त्याने विक्रीसाठी आणलेली दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले. तसेच युवराज निकम व किशोर जगदाळे या दोघांकडून नाममात्र 4400 रूपयांना ही दुचाकी विकत घेतल्याचे सांगितले. त्याकडून आणखी 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या . दरम्यान, पोलिसांनी निकम व जगदाळे दोघांनाही अटक केली.


यातील निकम याच्याकडून 2 तर जगदाळे याच्याकडून 16 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. पंढरपूर , म्हसवड, विटा, भिगवण दिघी, बारामती, चिंचवड, हडपसर , लोणी काळभोर अलंकार , वार्जे , सासवड या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी त्यांनी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आरोपींकडून आणखीही दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. 


संबंधित बातम्या