रायगड : रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या एका चोराला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. हा चोर एका कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन असल्याची माहिती आहे. संकेत अंजर्लेकर असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. महाड, माणगाव आणि दापोली परिसरात घरफोड्या करत त्यानं लाखो रुपयांचा ऐवज लुटला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  संकेत अंजर्लेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून 15 लाख रुपये किंमतीचे दागिने त्याच्याकडून जप्त केले आहेत.


संकेत कॉलेजमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. रायगड आणि रत्नागिरी परिसरात सुमारे 11 घरफोड्या केल्याची कबुली संकेतनं दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, तळा, गोरेगाव या परिसरात घरफोडीचे प्रमाण वाढले होते.


त्यामुळे, रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले होते.  यावेळी, या तपासामध्ये महाड येथील कॉलेजमध्ये लॅब- असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या अंजर्लेकर याला ताब्यात घेण्यात आले होते. 


यावेळी, या संशयित आरोपीकडे चौकशी केली असता त्याने रायगड आणि रत्नागिरी परिसरात घरफोड्या केल्या असल्याचे कबुली दिली आहे. यामध्ये, संकेत याने माणगाव, तळा, गोरेगाव, महाड आणि दापोली परिसरात सुमारे अकरा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.


दरम्यान आरोपीकडून सुमारे पंधरा लाख वीस हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर, आरोपी संकेत अंजर्लेकर हा रत्नागिरीतील हर्णे - अंजर्ले येथील रहिवासी असून सध्या तो कामानिमित्त महाड येथे राहत होता. यामध्ये, लॅब असिस्टंट असलेला संकेत हा परिसरात दिवसा घरांची रेकी करून घरफोड्या करत असल्याचे समोर आले आहे. 


तर आरोपी संकेत अंजर्लेकर याला न्यायालयात हजर केले असता त्याला 4 नोव्हेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.