Chandrapur Crime : राष्ट्रवादी काँग्रेसची चंद्रपूर शहर युवती प्रमुख असलेल्या एका तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वैष्णवी देवतळे असं या अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव असून आपल्या 2 साथीदारांसह एक खास शक्कल वापरून ही तरुणी मोपेड चोरी करत होती, अशी धक्कादायक बाब या तपासात स्पष्ट झाली आहे.


चंद्रपूर शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या तब्बल 11 मोपेड गाड्या चोरी करणाऱ्या 3 जणांच्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं 4 दिवस आधी अटक केली. 11 गाड्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली म्हणून पोलीस साहजिकच खूश होते. मात्र या तिघांपैकी एक असलेली आरोपी महिला राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असल्याचे समजताच पोलिसांना देखील धक्का बसला.


राजकीय पक्षाची कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांनी वैष्णवीच्या नावाबाबत गुप्तता पाळली. मात्र शरद पवार हे 18 आणि 19 तारखेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेतून शहर युवती प्रमुखाचं नाव का वगळण्यात आलं? याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा झाली आणि यातूनच वैष्णवी ही गाडी चोरीच्या प्रकरणात आरोपी असल्याची बाब पुढे आली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अतिशय सक्रिय असलेली वैष्णवी आपल्या दोन साथीदारांसह विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड गाड्या चोरायची. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेल्या वाहानावर ही टोळी लक्ष ठेवत असे. संधी साधून वैष्णवी त्या गाडीवर बसायची आणि तिचा साथीदार तिच्या गाडीतील पेट्रोल संपलं आहे, असं भासवून दुसऱ्या वाहनाने टो करायचा. नंतर निर्जनस्थळी मेकॅनिकच्या साथीनं गाडी सुरु करून तिची विक्री केली जायची. पोलीस तपासात या सर्व बाबी स्पष्ट झाल्यात. 


या प्रकरणी पोलीसांनी वैष्णवीसह तिचा मित्र मनीष पाल आणि मेकॅनिक असलेल्या सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांची 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. सध्या या प्रकरणात 11 गाड्या जप्त करण्यात आल्या असल्यातरी यामुळे गाडी चोरीच्या आणखी काही प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.


पॉलिटेकनिक तृतीय वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या वैष्णवीची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी नाहीतर मनीष पाल या मित्रामुळे ती गाडी चोरीच्या धंद्यात ओढली गेल्याची माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र चोरी मागील कारण काहीही असलं तरी तिच्या अटकेमुळं 18 आणि 19 तारखेला होणाऱ्या शरद पवार यांच्या चंद्रपूर दौऱ्याच्या ऐन तोंडावर जिल्ह्यातील नेत्यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :