छातीचे हाड तुटले, फुप्फुस बंद पडले, उघड्या डोळ्याने हृदयाचे ठोके ही दिसू लागले... मात्र डॉ.अंधारेनी दिले करणला जीवदान
कोणत्याही हॉस्पिटलने दाखल करुन घेण्यास नकार दिला असताना सोलापूरच्या (Solapur) डॉ. अंधारेनी (Dr. Andhare) 14 वर्षाच्या करणवर अवघड शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान दिलंय.
सोलापूर : करमाळा येथील देवाचीमाळ येथे 21 मार्च रोजी एक भीषण अपघात झाला. एका फॅक्टरीमध्ये काम करत असताना 14 वर्षाच्या करण पवार या मुलाचा हात मशीनच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला. बेल्टमध्ये हात अडकल्याने शरीर ओढत गेलं. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये मुलाची छाती कापली गेली. अपघातानंतर दिसणारे दृश्य हे अत्यंत विदारक होते.
करणचे हृदय आणि फुप्फुस दोन्ही उघडे पडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करणचे फुप्फुस देखील बंद पडू लागले. छातीतील सर्व हाड तुटली होती तर सर्व स्नायू देखील कापले गेले होते. हृदयाचे ठोके पडत असताना उघड्या डोळ्यांनी दिसत होते. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या करणला सोलापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र मुलाला श्वास घेण्यात अडचणी येत असल्याने त्याला श्वासाची नळी टाकत तत्परतेने मार्कंडेय सहकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
अशा अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये हृदय फुप्फुस शल्य विशारद डॉ.विजय अंधारे यांनी पुढाकार घेतला अन् त्यांच्या हाताला यश आलं. शस्त्रक्रियेची टिम तयार करून रुग्णाला बेशुद्ध अवस्थेत हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये हलवण्यात आलं. बंद पडलेल्या फुप्फुसाला व्हेन्टिलेट करून फुगवण्यात आले. फुप्फुसातून बाहेर जाणारी हवा बंद करण्यात आली. हृदयाच्या नसा उघड्या पडून त्यातून रक्त वाहत होत. मोडलेल्या छातीच्या हाडांना जवळ आणून ती फिक्स करण्यात आली. आश्चर्य म्हणजे शस्त्रक्रियेच्या तासाभरानंतरच रुग्ण शुद्धीवर येऊन चक्क बोलू ही लागला.
हातचा गेलेल्या मुलाला परत जीवदान मिळाल्याने पवार कुटुंबीयांचा आनंदाला पारावर उरला नाहीये. "अपघातानंतर मुलाला जखमी अवस्थेत घेऊन अनेक रुग्णालयात गेलो. मात्र मुलाची स्थिती पाहता कोणतेही रुग्णालाय दाखल करुन घेण्यास तयार नव्हते. सोलापुरच्या मार्कंडेय रुग्णालयात मुलाला आणण्यात आलं. दाखल करण्यासाठी पैसे देखील नव्हते. मात्र पैशाची कोणतीही मागणी न करता डॉ. अंधारे यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे माझा मुलगा मला परत मिळाला" अशी भावना मुलाचे वडील नागनाथ पवार यांनी व्यक्त केली.
"अपघातामुळे मुलाचे फुप्फुस बाहेर पडले होते. त्यामुळे फुप्फुसाजवळून हवा बाहेर पडत होती. हृदयाजवळील नसा तुटल्याने रक्त मोठ्या प्रमाणात बाहेर येत होते. मात्र सुदैवाने हृदयाला कोणतीही ईजा झालेली नव्हती. अथक प्रय़त्न केल्यानंतर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर मुलगा शुद्धीवर येण्यास एक ते दोन दिवस लागतील असे आम्हाला वाटले होते. मात्र अवघ्या एका तासात मुलाला शुद्धी आली आणि दीड तासात मुलाला व्हेंटिलेटर वरुन काढल्यानंतर तो बोलू देखील लागला. इतक्या गंभीर परिस्थितीत आलेल्या मुलाला अवघ्या 6 दिवसात आम्ही डिस्चार्ज देखील करत आहोत " अशी प्रतिक्रिया डॉ. विजय अंधारे यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या :
- Shirdi | शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शन वेळेत बदल, सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं
- Sachin Vaze | मनसुख हिरण आणि सचिन वाझे यांच्यात मर्सिडीज कारमध्ये नऊ मिनीटांची चर्चा, सीसीटीव्हीतून स्पष्ट
- देशातील प्रत्येक प्लॉटला मिळणार Unique ID क्रमांक, मार्च 2022 पर्यंत पूर्ण होणार काम