मधुकर पिचडांना धक्का बसणार, पिचडांचे खंदे समर्थक सीताराम गायकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सीताराम गायकर यांनी आता भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांची साथ सोडत हातावर घड्याळ बांधण्याचं ठरवलं आहे. अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 आणि गायकर असे पिचडांचे दहा खंदे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
अहमदनगर : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर यांची आज घरवापसी होणार आहे. सीताराम गायकर आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून सीताराम गायकर हे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचवेळी गायकर राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.
अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर यांचेवर शेलक्या शब्दात टीका केली होती. विधानसभा निवडणुका होऊ द्या तुमचे धोतर कसे फेडतो, अशा शब्दात अजित पवारांनी गायकर यांच्यावर टीका केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत सीताराम गायकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमागे अजित पवार यांचीच खेळी होती. सीताराम गायकर यांनी आता भाजपमध्ये गेलेल्या पिचड यांची साथ सोडत हातावर घड्याळ बांधण्याचं ठरवलं आहे. अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे 9 आणि गायकर असे पिचडांचे दहा खंदे समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत सिताराम गायकर?
- 71 सीताराम गायकर यांनी सुरुवातीच्या काळात ऊस तोड कामगार म्हणून काम केलं.
- मेगरस येथे दूध संकलन केंद्राची सुरूवात केली.
- अमृत सागर दुध संघाचे संचालक.
- 1995 मध्ये मधुकर पिचडांविरोधात बंड करत तिसऱ्या आघाडीची स्थापन केली. मात्र तिसरी आघाडी सपशेल फोल ठरली.
- अशोक भांगरेचा मधुकर पिचडांनी 35 हजाराच्या फरकाने त्यावेळी पराभव केला.
- निवडणुकीनंतर काही दिवसांनी पुन्हा मधुकर पिचडांसोबत आले.
- अगस्ती ग्रामीण दूध संघाचे ते संचालक झाले.
- त्यानंतर दुध संघाच्या चेअरमनपदी वर्णी.
- 1988 साली अगस्ती सागर कारखाना स्थापना झाला त्यात ते संचालक झाले.
- अकोले तालुका एज्यकेशन विश्वस्त संचालक.
- अगस्ती ग्रामीण पतसंस्थेचे फाऊंडर अध्यक्ष.
- अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक.
- मधुकर पिचडांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केलं.
- आता पुन्हा जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक.